नागपूर समाचार : केंद्र व राज्य शासनाने विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या आहेत. तसेच पैनगंगा-वैनगंगा जोड प्रकल्प, गोसीखुर्द प्रकल्प, सुरजागड प्रकल्प, भद्रावती येथील युरिया निर्मिती प्रकल्प, गोसीखुर्द जलप्रकल्पासारख्या मोठ्या प्रकल्पांना शासनाने गती दिली आहे. त्यामुळे विदर्भातील लोकसभेच्या सर्व जागा महायुती जिंकेल, असा दावा शिवसेनेचे (शिंदे गट) सहमुख्य प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आज नागपुरात केला. प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना राजू वाघमारे म्हणाले, महाविकास आघाडीला चांगले दिवस येणार असे बोलले जाते. परंतु, विदर्भात एकही जागा मिळणार नाही. काँग्रेसची स्थिती फार खराब आहे. हा पक्ष नेतृत्वहीन आहे. नेते आपसात भांडत आहेत. त्यामुळे अनेक काँग्रेस नेते पक्ष सोडत आहेत.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी काँग्रेस सोडली. शिवसेनेत प्रवेश राजू पारवे त्यानंतर मी आमच्यामागे कुठलीही ईडी, सीबीआय नाही. केवळ विकासाच्या मुद्यावर पक्षांतर केले. घेतला मात्र, विरोधक ईडी, सीबीआयविषयी अपप्रचार करीत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यात महाविकास आघाडी लोकसभेची निवडणूक लढवीत असली तरी नेत्यांमध्ये भांडणे आहेत. काँग्रेसचे नेते उबाठाचे काम करू नका, असे सांगतात, तर उबाठाचे नेते काँग्रेस उमेदवारांचे काम करू नका, असे सांगत आहेत. त्यामुळे या आपसी भांडणात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभव निश्चित आहे. असेही वाघमारे यांनी सांगितले.
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवरील आरोप फेटाळले
उबाठा पक्षाचे खा. संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर केलेले आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप राजू वाघमारे यांनी फेटाळून लावले. या फाऊंडेशनतर्फे हृदयाला छिद्र असलेल्या ५ हजार बालकांचे ऑपरेशन करण्यात आले. १०० रुग्णावाहिका देण्यात आल्या. या फाऊंडेशनतर्फे गरीब रुग्णांना मदत केली जाते. उलट खा. राऊत यांनी आपल्या मुलींच्या नावाने खिचडीच्या नावावर ५० लाख खात्यात जमा केले. पण त्याचा कुठलाही हिशोब दिला नाही, असे प्रत्युत्तर वाघमारे यांनी खा. राऊत यांच्या आरोपांवर दिले.