राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त डॉ. माईज हक, सशिन रॉय यांचा उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणुन गौरव
नागपूर समाचार : राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख डॉ. मोईज मन्नान हक व पत्रसुचना कार्यालयाचे उपसंचालक सशिन रॉय यांचा उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी गौरव करण्यात येणार आहे.
सभागृहात पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चाप्टर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूर-अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जनसंपर्क दिन साजरा करण्यात येणार आहे. रवीभवन येथील सभागृहात सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास कराड विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेदप्रकाश मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. राहुल तिडके यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. पीआरएसआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.पी.सिंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त सनातन व्हॅल्यु अँड इमर्जीन इंडिया, रोल ऑफ पब्लिक रिलेशन या विषयावर डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर शाखेचे अध्यक्ष यशवंत मोहिते, सचिव मनीष सोनी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार तसेच माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर यांनी केले आहे.