नागपूर समाचार :- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कमी तीव्रतेच्या भुकंपाची नोंद होत आहे. भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण (Geological Survey of India) विभागानुसार नागपूर जिल्ह्यातील भुकंप हे अतिशय सौम्य प्रकारचे भुकंप आहेत. यातून कोणतीही हानी होणार नाही व नागरीकांनी घाबरण्याची गरज नाही असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
मार्च व मे महिन्यात सौम्य भुकंपाच्या थोड्या फरकाने होणाऱ्या नोंदीमुळे संपुर्ण नागपूर जिल्ह्याची सुक्ष्म भुकंप तपासणी व अभ्यास (Micro Earthquake Investigation & Study) करण्यासाठी भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला विनंती करण्यात आली असल्याचे डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले.
पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय भुकंप विज्ञान केंद्रे (National Center for Seismology) या पोर्टलवर नागपूर जिल्ह्यात माहे मार्च महिण्यापासून एकूण 9 भुकंप तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिण्यात 2 भुकंपाची नोंद करण्यात आलेली आहे. या भुकंपाची तीव्रता अत्यल्प २ ते २.८ रिक्टर स्केलमध्ये असून भुकंपाचे धक्के नागरिकांना जाणवलेले नाहीत. या भुकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही.
भुकंप प्रवणतेनुसार भारताचे ४ भुकंप क्षेत्रात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. सिसमिक झोन (Seismic Zone) II, III, IV व V असे वर्गीकरण असून नागपूर जिल्हा हा झोन ।। भुकंप क्षेत्रात मोडल्या जातो. हा झोन सर्वात कमी सक्रिय क्षेत्र असल्याने भुकंपाच्या दृष्टीने इतर झोनच्या तुलनेत सुरक्षित झोन म्हणून ओळखला जातो.
जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून सावधगिरी म्हणून थोडी खबरदारी घ्यावी, अधिक माहितीकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी 0712-2562668 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.