- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : भाऊ काणे यांनी समर्पित भावनेतून खेळाडू घडविल

बॅडमिंटन प्रशिक्षक किरण माकोडे यांना भाऊ काणे स्मृती उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार प्रदान

नागपूर समाचार :- उत्तम खेळाडू तयार व्हायचे असतील तर उत्तम प्रशिक्षक तयार होणे आवश्यक आहे. भाऊ काणे यांनी एक समर्पित प्रशिक्षक म्हणून कार्य केले त्यामुळेच त्यांच्या तालमीत तयार झालेले खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. त्यांनी समर्पित भावनेतून खेळाडू घडविले, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ प्रशिक्षक स्व. भाऊ काणे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ तसेच चैतन्य स्पोर्ट्स, योग अँड कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बॅडमिंटन प्रशिक्षक किरण माकोडे यांना भाऊ काणे स्मृती उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. भाऊ काणे यांच्या जयंतीप्रित्यर्थ गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. अनिल करवंदे, सत्कारमूर्ती किरण माकोडे, पल्लवी माकोडे, धनंजय काणे, चारुलता नायगांवकर-बेहरे, प्रशांत जगताप यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. किरण माकोडे यांना बॅडमिंटन क्षेत्रात उत्तम खेळाडू घडविणारे प्रशिक्षक म्हणून भाऊ काणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू करण्यात आलेला पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. ना. श्री. गडकरी यांनी किरण माकोडे यांचे अभिनंदन करतानाच भाऊ काणे यांच्यासारखे प्रशिक्षक तयार होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

ते म्हणाले, ‘भाऊ काणेंसारखा उत्तम प्रशिक्षक आज आपल्यात नाही, याची खंत आहे. पण त्यांच्याप्रमाणेच समर्पित भावनेतून खेळाडू घडविणारे प्रशिक्षक तयार झाले तर ती भाऊंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे.’ ‘भाऊ काणे यांनी क्रीडा, शिक्षण तसेच अध्यात्म क्षेत्रातही मोठे कार्य केले. माझे त्यांचे जवळपास ४५ वर्षांचे ऋणानुबंध होते. अनेक वर्षे त्यांचे कार्य मला जवळून बघण्याची संधी मिळाली. भाऊंनी सामान्य खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. या कामगिरीत खेळाडूंचे जेवढे योगदान आहे, तेवढेच भाऊ काणे यांचेही श्रेय आहे. ते सराव करून घेण्यासाठी स्वतःला झोकून द्यायचे,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘लहान मुलांच्या हाती आज मोबाईल फोन आले आहेत. तरुण पिढी घडवायची असेल तर खेळाडूंचे व्यक्तित्व क्रीडांगणावर घडवावे लागेल, असा भाऊ काणे यांचा आग्रह असायचा. त्यामुळे उत्तम मैदाने नागपुरात तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून वातावरण तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला. यावर्षी ७० हजार खेळाडू यामध्ये सहभागी झाले. पुढील वर्षी १ लाख खेळाडू यामध्ये खेळले पाहिजे, यासाठी मी आग्रही आहे,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. यावेळी खेळाडू व प्रशिक्षकांची नियमीत आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश शेळके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *