कान्द्री-माईन परिसरातील घटना, घराच्या अंगणात मित्रांसोबत खेळत होता
रामटेक/कान्द्री समाचार :- खेळत असताना अचानक अंगणात लावण्यात आलेला लोखंडी गेट एका चिमुकल्याच्या डोक्यावर पडल्याने उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यु झाल्याची घटना दिनांक 15 मे ला सकाळी घडली.
प्राप्त माहितीनुसार, तालुका रामटेक अंतर्गत कान्द्री-माईन येथील रहिवासी विशाल मसराम यांचा 3 वर्षाचा मुलगा रोशित विशाल मसराम हा घराजवळील दीपक गणेश कठोते यांच्या घराच्या अंगणात आपल्या 3 मित्रांसोबत खेळत होता. अंगणातील लोखंडी गेट पूर्णपणे बंदिस्त नसल्याने हा 3 वर्षाचा चिमुकला गेटजवळ गेला असता अचानक त्याच्या अंगावर भलामोठा लोखंडी गेट पडला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला.
परिसरातील लोकांनी चिमुकल्याच्या अंगावरील गेट उचलून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र, मनसर येथे नेले. मात्र डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा प्राथमिक उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिमुकल्याच्या अशा एका एकी निघून गेल्याने त्याच्या आई, वडील व कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.