- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : शहरातील 400 अवैध होर्डिंग ठरु शकतात यमदूत, यातील रेल्वेचेही 200 होर्डिंग जीवघेणे

◾सरकारच्या स्काय साईन आणि जाहिरातींच्या प्रदर्शनाचे नियमन आणि नियंत्रण नियमावलीचेही पूर्णपणे उल्लंघन

◾अवैध होर्डिंगविरोधात आमदार विकास ठाकरेंची मनपा आयुक्तांकडे तक्रार

नागपूर समाचार :- अवैध होर्डिंग पडल्यामुळे मुंबईत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र नागपुरातही चौकाचौकात उभे असलेले 400 अवैध होर्डिंग नागपुरकरांसाठी यमदूत ठरु शकतात. राज्य सरकारच्या स्काय साईन आणि जाहिरातींच्या प्रदर्शनाचे नियमन आणि नियंत्रण कायद्याचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या या होर्डिंगमुळे मोठा अपघातही होऊ शकतो. यातच रेल्वेने परवानगी दिलेले सुमारे 200 होर्डिंगही जीवघेणे ठरु शकतात. या संदर्भात नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक यांना या अवैध होर्डिंगवर तत्काळ कारवाई करण्यासाठी तक्रार केली आहे.

रेल्वेचे 200 पेक्षा अधिक होर्डिंग अतिधोकादायक

खासगी एजन्सीला लाभ मिळवून देण्यासाठी रेल्वेनेही 200 पेक्षा जास्त होर्डिंगला परवानगी दिली असून यापैकी एकही होर्डिंग महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये तयार केलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे नाही हे विशेष. मात्र याचे कुठलेही संरचनात्मक स्थिरता ऑडिट करण्यात येत नाही. यापैकी अनेक होर्डिंग हे रेल्वे अंडरब्रिज, रेल्वे स्थानकांवर आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. वारा सुटल्यावर हे सर्व होर्डिंग हालतात. त्यामुळे कुठल्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भिती असते. तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असणे ही गंभीर बाब आहे.

40×30 पेक्षा दुप्पट आकाराचे अवैध होर्डिंग

होर्डिंग कोसळून राज्यात अनेकांचे जीव गेल्यावर यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने 2022 मध्ये स्काय साईन आणि जाहिरातींच्या प्रदर्शनाचे नियमन आणि नियंत्रण नियमावली तयार केली. यानुसार जास्तीत जास्त 40*30 फुटांपर्यंत होर्डिंगला परवानगी आहे. मात्र शहरात मोठ्या प्रमाणात या आकारापेक्षा तब्बल दुप्पट होर्डिंग यमदूत बनून चौकाचौकात उभे आहेत.

शहरातील सर्व ‘युनिपोल’ होर्डिंग बेकायदा

एकाच पोलवर उंच होर्डिंग लावण्यात येणाऱ्या होर्डिंगला ‘युनिपोल होर्डिंग’ असे म्हणतात. मात्र राज्य सरकारने तयार केलेल्या 2022 मधील नियमावलीमध्ये यासंदर्भात कुठलीही तरतूद नाही. याशिवाय 40 फुटांपेक्षा जास्त उंचीवर एकही होर्डिंग लागू शकत नाही. मात्र युनिपोलवीरल बहुतांश पोलची उंची ही 80 फुटांच्यावर आहे. त्यामुळे एकाच पोलवरील इतक्या उंच होर्गिंड खालून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी किती घातक ठरु शकतो याचा अंदाज लावता येतो. त्यामुळे सर्वप्रथम हे सर्व युनिपोल होर्डिंग काढून टाकणे हाच एकमेव पर्याय उरतो.

एका स्ट्रक्चरवर एकच होर्डिंगला परवानगी

एका स्ट्रक्चरवर फक्त एका होर्डिंगची परवानगी असताना याठिकाणी दोन ते तीन होर्डिंग लावण्यात आले आहे. याशिवाय महानगरपालिका दर तीन वर्षांनी होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट मागत असते. तीन वर्षे हा मोठा काळ असून या होर्डिंगचे ऑडिट दर सहा महिन्यात करणे गरजेचे असल्याची मागणीही ठाकरे यांनी केली आहे. तसेच होर्डिंगचा आकार मोठा असल्याने वादळ-वारा सुटल्यास अपघाताची टांगती तलवार नागपूरकरांच्या डोक्यावर लटकत आहे. या विरोधात आमदार विकास ठाकरे यांनी तक्रार करुन यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गर्दीच्या ठिकाणचे होर्डिंग धोकादायक

शहरात पेट्रोलपंप तसेच अनेक गर्दीच्या ठिकाणी मोठे होर्डिंग उभे केले आहे. मात्र याची गंभीरतेने तपासणी झाली नाही तर एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणचे होर्डिंग हटविणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *