- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : मतमोजणीचे कर्तव्य अधिक दक्षतेने पार पाडा – डॉ. विपीन इटनकर

प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; मतमोजणीबाबत प्रशिक्षण सुरू 

नागपूर समाचार :- मतमोजणीतील कर्तव्य पार पाडताना सर्वांना विश्वासात घेऊन अधिक जबाबदारीने मतमोजणी व्हावी यावर प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. मतमोजणीसाठी उपस्थित असलेल्या विविध उमेदवार प्रतिनिधींच्या मनात जर काही शंका असतील तर त्याचे तात्काळ निरसन झाले पाहिजे. सकाळी 6 पासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत आपल्याला संयमाने काम करायचे आहे ही मानसिकता ठेवा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

रामटेक व नागपूर लोकसभा निवडणुकीची मतमेाजणी येत्या 4 जूनला कळमना मार्केट येथे होणार असून त्या दृष्टीने मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित या प्रशिक्षणास अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, प्रशिक्षक सचिन कुमावत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

4 जूनला सर्वसाधारण मोजणी व पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी सर्वात अगोदर होणार आहे. 500 बॅलेट पेपरसाठी एक टेबल असेल. यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. पोस्टल मतपत्रिकेसाठी 10 टेबल 10 अधिकारी राहणार आहेत. यापूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम हातळण्याबाबतचे पहिले प्रशिक्षण देशपांडे सभागृहात पार पाडले आहे. आजच्या प्रशिक्षणात पोस्टल मतपत्रिका कशी उघडावी, मत कसे गणण्यात यावे याबाबत माहिती देण्यात आली.            

प्रशिक्षणात मतमोजणीसाठी करावयाची टेबलनिहाय रचना, माध्यम कक्ष, सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी, आपत्ती संबंधी नियंत्रण कक्ष, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावयाची पूर्वतयारी, भोजन व्यवस्था, मतमोजणी प्रक्रियेतील गोपनियता याबाबत सादरीकरण करण्यात आले. या मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी कर्मचाऱ्यासाठी प्रथमोपचाराचे साहित्य व वैद्यकिय उपचार सुविधेबाबतही निर्देश देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *