- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : हज यात्रेकरुंच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

27 मे पासून 31 मेपर्यंत 1444 यात्रेकरु होणार रवाना 

नागपूर समाचार : हज यात्रेसाठी नागपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून प्रस्थान करणाऱ्या यात्रेकरुंच्या सेवा सुविधेसाठी प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दिनांक 27 मे पासून 31 मे पर्यंत विमानाच्या चार फेऱ्यात सुमारे 1 हजार 444 यात्रेकरु रवाना होणार आहेत. यात्रेकरुंच्या सेवा सुविधांबाबत आज विमानतळ येथील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. याबैठकीस मिहानचे वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रुही, महाराष्ट्र हज कमिटी चेअरमन आशिफ खान, उपजिल्हाधिकारी वसीमा शेख, कार्यकारी अधिकारी इम्तियाज काजी, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शेळके, सौदी एअर लाईन्स व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. 

नागपूर विमानतळावर यात्रेकरुंच्या सुविधेसाठी पिण्याच्या पाण्यासह वजूसाठी सुविधा, आपात्कालीन वैद्यकीय पथक, अतिरिक्त टॉयलेट सुविधा, व्हीलचेअर्स आदी सुविधा बाबत दक्षतेच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आल्या. सौदी एअर लाईन्सच्या एअरबसमध्ये 361 प्रवासी या प्रमाणे चार फेऱ्यांमध्ये एकूण 1 हजार 444 प्रवासी हज यात्रेसाठी जातील. दिनांक 6 ते 9 जुलै या कालावधीत चार फेऱ्यांमध्ये हे यात्रेकरु सुखरुप नागपूर विमानतळावर परततील. यावर्षी प्रथमच महाराष्ट्र स्टेट हज कमिटीद्वारे यात्रेकरुंच्या सुविधांचे व यात्रेचे संचलन केले जात आहे.

विमान प्रवासात, ज्या बाबी नेता येत नाहीत अशा वस्तुंची यादी यात्रेकरुपर्यंत पोहचविण्यात आली आहे. प्रत्येक यात्रेकरुंना आपल्या सोबत नेता येऊ शकेल तेवढेच सामान सोबत घेण्याचे आवाहन हज कमिटीद्वारे करण्यात आले आहे. मसाले, लहान चाकू, तिखट व इतर बंदी घातलेल्या कोणत्याही पदार्थांना सोबत नेता येणार नाही. सर्व यात्रेकरुंनी हज कमिटीच्या कार्यालयात वेळेपूर्वी पोहोचून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तेथूनच सर्व सामान पाठविण्यासाठी नियोजन करण्यात आले असून बसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती हज कमिटीच्या वतीने देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *