- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : नदी सफाईचे 60 टक्के कार्य पूर्ण, निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याकडे लक्ष  

नागपूर समाचार : पावसाळ्यापूर्वी शहरातील नदी आणि नाले सफाईचे काम पूर्ण व्हावे यादृष्टीने कार्याला गती देण्यात आलेली आहे. नागपूर शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तिनही प्रमुख नद्यांची आतापर्यंत एकूण 60 टक्के स्वच्छता झालेली आहे. उर्वरित कामे 15 जुन पर्यंत करण्याचे नियोजन मनपा तर्फे करण्यात आले आहे.

पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे नदीच्या प्रवाहाला अडथळा होउ नये व सुरळीतरित्या पाणी वाहून जावे यादृष्टीने निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

नागपूर शहरातून वाहणा-या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे. फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तिनही नद्यांच्या सफाई अभियानाने गती पकडली आहे. या सफाई अभियानामध्ये नदीच्या सखोल स्वच्छतेवर भर देउन जास्तीत जास्त गाळ काढला जात आहे. नाग नदीची लांबी १६.५८ किमी, पिवळी नदीची लांबी १७.४२ आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहे. यापैकी या तिनही नद्यांचे एकूण 60 टक्के काम झालेले आहे. तिनही नद्यांच्या सफाईमधून 15 पोकलेन द्वारे ९३९१८.०४ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. १५ जून २०२४ पूर्वी शहरातील तिनही नद्यांची स्वच्छता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. नदी स्वच्छतेच्या कार्यात आवश्यक मशीन आणि मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले असून निर्धारित वेळेत कार्य पूर्ण व्हावे याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे.

नागपूर शहरात एकूण २२७ नाले असून यापैकी १५३ नाल्यांची सफाई मनुष्यबळाद्वारे तर ७४ नाल्यांची सफाई मशीनद्वारे केली जाते. आतापर्यंत 170 पेक्षा जास्त नाल्यांची सफाई पूर्ण झालेली असून उर्वरित नाल्यांची सफाई लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *