जैवविविधतेवर राज्यस्तरीय कार्यशाळा
नागपूर समाचार : जैवविविधतेचे केंद्र म्हणून नागपुरची ओळख असून शहारातील जैवविविधता संवर्धन व संरक्षणासाठी महानगर पालिकेने जैवविविधता निर्देशांक तयार करून राज्यातील या उपक्रमाची सुरुवात करावी, अशी सूचना आज प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांनी केली. तसेच, नागपूर जिल्ह्यातील विविध तलाव चिन्हीत करून जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने कार्य व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने येथील चिटणवीस सेंटरच्या टॅमरिंड सभागृहात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. टेंभुर्णीकर बोलत होते.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव एम.श्रीनिवास राव, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहसंचालक विराज पवनीकर, राजीव गांधी बौद्धिक संपदा संस्थेचे श्री. सूर्यवंशी, उपवन संरक्षक डॉ.भारत सिंह हुडा यावेळी उपस्थित होते.
नागपूर शहराच्या सभोवताली सेमिनरी हिल, गोरेवाडा आणि अंबाझरी तलाव भागात मोठया प्रमाणात जैवविविधता आढळून येत असल्याने जैवविविधतेचे केंद्र म्हणून नागपूर शहराची ओळख आहे. जैवविविधता संवर्धन व संरक्षणासाठी राज्य जैवविविधता मंडळाच्या उपक्रमांतर्गत महानगर पालिकेद्वारे शहर जैवविविधता निर्देशांक तयार करून राज्यात या उपक्रमाचा प्रारंभ करावा,असे श्री. टेंभुर्णीकर म्हणाले. देशाच्या एकूण जैवविविधतेत राज्यातील वनस्पतींसह, प्राणी,पक्षी यांच्या वाट्याबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली. पश्चिमघाटातील जैवविविधता संवर्धनासाठी राज्याने उचलेली पावले, गवती कुरण, महाराष्ट्र जनूक बँक आदिंवरही त्यांनी प्रकाश टाकला. नागपूर जिल्ह्यातील विविध तलावांशेजारील जैवविविधतेचे संवर्धन होण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेने वनविभागाच्या समन्वयाने कार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ.अभिजीत चौधरी यांनी जैवविविधता ही मानवाला निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी असल्याचे सांगत त्याच्या संवर्धणासाठी लोकसहभागाची गरज व्यक्त केली. मनपाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या जैवविविधता रजिस्टरची माहिती त्यांनी दिली. नागरी भागात जैवविविधता जपण्यासाठी येणाऱ्या मर्यादा अधोरेखित करताना मनपा क्षेत्रात जैवविविधता जपण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याबाबत सकारात्मकताही त्यांनी व्यक्त केली.
ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची माहिती देतांना सौम्या शर्मा यांनी जैवविविधता संवर्धनासाठी नागपूर जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले. जैवविविधता संवर्धनासाठी जिल्हा परिषदेद्वारे सुरु करण्यात आलेल्या इको क्लबची त्यांनी माहिती दिली. महिला बचत गट आणि पशुसखीच्या माध्यमातून जनजागृतीची ही मोहिम अधिक बळकट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वन विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यातील विविध तलाव चिन्हीत करून जैवविविधता संवर्धनाच्यादृष्टीने सकारात्मक पावले टाकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री.पवनीकर आणि श्री. सूर्यवंशी यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षपुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वन विभागाच्या प्रसिद्धी व माहिती अधिकारी राजेश्वरी बोंगाळे यांनी सूत्रसंचालन केले तर वनाधिकारी रुपाली सावंत यांनी आभार मानले.