जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला आढावा
नागपूर समाचार :- नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात जय्यत तयारी केली जात असून सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे दक्ष आहे. कळमना मार्केट मधील व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाला आजवर कोणतीही बाधा येऊ न देता जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या कामाची व्यवस्था व कामे पूर्ण करण्यावर आजवर भर दिला.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज प्रत्यक्ष कळमना मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राच्या पाहणी व सुरक्षिततेचा आढावा घेतला. अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
येत्या 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीत प्रारंभी पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. 500 बॅलेट पेपरसाठी एक टेबल याप्रमाणे 10 टेबल 10 अधिकारी राहणार आहेत. यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत.
ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी नागपूर लोकसभेसाठी 120 टेबल व रामटेकसाठी 120 टेबल या प्रमाणे मतमोजणीची रचना करण्यात आली आहे. राजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता यावी यादृष्टीनेही नियोजन केले आहे. दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी एकूण सुमारे सहा हजार एवढे मनुष्यबळ कार्यरत राहील. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरिक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडेल.