- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : मतमोजणीसाठी वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

सुरक्षेसाठी कळमना येथील मार्केट यार्ड 3 ते 5 जूनपर्यंत बंद

नागपूर समाचार : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी कळमना मार्केट येथे ४ जून रोजी सकाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज कळमना परिसरातील पार्किंग, वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले. मतमोजणीसाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण व जबाबदाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांवर निश्चित करुन दिल्या आहेत. आपल्या कर्तव्यात कुठेही कसूर होणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे आदेश डॉ.इटनकर यांनी दिले. 

मतमोजणी पूर्व तयारी व काटेकोर नियोजनासाठी आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस पोलिस उपायुक्त निकेतन कदम, रामटेकचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे आदी उपस्थित होते. 

मतमोजणीच्या दिवशी कुठल्याही प्रकारे नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेऊन मतमोजणी परिसरातील सुरक्षा व्यवस्था व वाहतूक व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे नियोजन, सनियंत्रण व अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येकाने आपापली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी. निवडणूक कामात कुठेही दिरंगाई होता कामा नये, असे जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी सांगितले. टेबलवरील प्रत्यक्ष मतमोजणी, टपाली मतपत्रिका व इतर कार्यवाही विहितपणे पार पडेल याची दक्षता घ्या अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या नागपूर जिल्ह्यातील 09-रामटेक व 10-नागपूर या लोकसभा मतदारसंघांकरीता दिनांक 19एप्रिलला मतदान घेण्यात आले. मतदान झालेली ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स न्यु ग्रेन शॉप कम गोडावून ब्लॉक नंबर 9, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, पंडीत जवाहरलाल नेहरु मार्केट यार्ड, कळमना, नागपूर येथील स्ट्रॉगरुम मध्ये सशस्त्र पोलीस सुरक्षेत ठेवण्यात आले आहेत. मतमोजणी दिनांक 4 जून, 2024 रोजी सकाळी 8 वाजतापासून फ्रुट ऑक्शन हॉल क्रमांक 3 व 4, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, पंडीत जवाहरलाल नेहरु मार्केट यार्ड, कळमना, नागपूर येथे होणार आहे.

मतमोजणीच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होण्याचे दृष्टीने मार्केट यार्डातील संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार असल्याने मार्केट यार्ड कळमना परिसरात अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे 3 जून, 2024 रोजी सकाळी 8 वाजता पासून ते 5 जून, 2024 रोजी दुपारी 2 वाजतापर्यंत बाजार बंद ठेवून कोणत्याही व्यक्ती व वाहनांस भारत निवडणूक आयोगाचे अधिकृत ओळखपत्र,वाहतूक पास,पूर्व परवानगी असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, पंडीत जवाहरलाल नेहरु मार्केट यार्ड, कळमना येथील संबंधित व्यापारी संघटना, व्यापारी, आडते, कर्मचारी, शेतकरी, हमाल, कामगार व इतर व्यक्तींनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *