स्व. कृष्णराव भागडीकर यांनी विद्यार्थी परिषदेचा पाया मजबूत केला
नागपूर समाचार :- स्व. डॉ. कृष्णराव भागडीकर यांनी अतिशय प्रतिकूल काळात विद्यार्थी परिषदेचे काम केले. त्यांच्यावर बाळासाहेब देवरस यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता. विद्यार्थी परिषदेचे विदर्भाचे संघटन मंत्री म्हणून भागडीकर यांनी अनेक लोक जोडले. एक कुशल संघटक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करताना विद्यार्थी परिषदेचा पाया त्यांनी मजबूत केला, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आठवणींना उजाळा दिला.
स्त्री शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित महिला महाविद्यालय नंदनवन येथे निर्माण करण्यात आलेल्या प्राचार्य डॉ. कृष्णराव भागडीकर स्मृती सभागृहाचे उद्घाटन ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र फडणवीस, प्राचार्या वंदना भागडीकर, तात्या मंडलेकर, दिलीप खोडे, निशांत पाध्ये, विजय भागडीकर, माजी आमदार नागो गाणार, वसंतराव काणे, प्रकाश एदलाबादकर यांची उपस्थिती होती. स्व. डॉ. कृष्णराव भागडीकर यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या स्मरणिकेचे यावेळी ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाने एका उत्तम सभागृहाची निर्मिती केल्याबद्दल ना. श्री. गडकरी यांनी अभिनंदन केल व प्रशिक्षण, संस्कार आणि प्रबोधनासाठी या सभागृहाचा उपयोग होईल, असा विश्वासही व्यक्त केला. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘दत्ताजी डिडोळकर आणि कृष्णराव भागडीकर विद्यार्थी परिषदेचे आधारस्तंभ होते. त्यांनी आपल्या अनुभवातून संघटन उभे केले. भागडीकर यांनी शिक्षण क्षेत्रात व्यक्ती निर्माणाचे कार्य केले. त्यांचे जीवन जवळून बघण्याची मला संधी मिळाली.
विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांसाठी समर्पित भावनेने कार्य करणारा निःस्पृह कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे कार्य, विचार, त्याग आणि संसार सांभाळून देशासाठी कार्य करण्याची त्यांची प्रवृत्ती आजही सर्वांच्या लक्षात आहे.’ रविंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून सभागृहाच्या निर्माणासाठी पुढाकार घेतल्याचेही ते म्हणाले. यावेळी स्व. लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये १६०० शाळांचे संचालन होत असून १८०० शिक्षकांच्या मार्गदर्शनात १८ हजार आदिवासी विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत असल्याचा उल्लेखही ना. श्री. गडकरी यांनी केला.