विमानतळ व निवासस्थानी कार्यकर्ते व चाहत्यांची तुफान गर्दी
नागपूर समाचार :- पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या सलग तिसऱ्या कार्यकाळात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, प्रथमच नागपुरात आगमन झाल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तथा नागपूरचे खासदार ना. श्री. नितीन गडकरी यांचे आज (गुरुवार, दि. १३ जून २०२४) नागपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ना. श्री. गडकरी यांचे आगमन झाले. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘नितीन गडकरी… आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा दिल्या. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी आमदार अशोक मानकर, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार गिरीष व्यास, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, भाजप नेते उपेंद्र कोठेकर, जयप्रकाश गुप्ता, विष्णू चांगदे व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्यांनी ना. श्री. गडकरी यांचे स्वागत केले. त्यानंतर वर्धा मार्गावरील निवासस्थानी देखील ना. श्री. गडकरी यांचे पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. घरी त्यांच्या अर्धांगिनी सौ. कांचंताई गडकरी यांनी औक्षण केले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूरकरांचे प्रेम हेच माझे संचित
नागपूरकर जनता माझा परिवार आहे आणि जनतेचे प्रेमच माझे खरे संचित आहे. याच प्रेमाची ऊर्जा घेऊन आता अधिक जोमाने काम करणार आहे, अशी भावना ना. श्री. गडकरी यांनी नागपुरात दाखल झाल्यानंतर व्यक्त केली.
चामुंडी एक्सप्लोजिव्हज येथील घटनेनंतर मिरवणूक स्थगित
हिंगणा तालुक्यातील चामुंडी एक्सप्लोजिव्ह फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर ना. श्री. गडकरी यांनी कार्यकर्ते व चाहत्यांना विमानतळ ते निवासस्थानदरम्यान ढोल ताशाच्या गजरात निघणारी मिरवणूक स्थगित करण्याची विनंती केली होती. आवाहनाला प्रतिसाद देत मिरवणूक आणि जाहीर सभा स्थगित करण्यात आली. ना. श्री. गडकरी यांनी घटनेतील मृतात्म्याना श्रध्दांजली अर्पण केली.