- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपुर समाचार : नाग नदी स्वच्छता प्रकल्पाच्या कामाला गती द्या; केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे निर्देश

ऑरेंज सिटी स्ट्रीटसह विविध विकास कामांचा घेतला आढावा

नागपूर समाचार :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नागनदी स्वच्छता प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश आज (मंगळवार, दि. १८ जून २०२४) मंत्री महोदयांनी दिले. २४३४ कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या असलेल्या सर्व प्रक्रिया देखील वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश ना. श्री. नितीन गडकरी यांनी दिले.

रवी भवन येथे ना. श्री. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत नागपूर शहरातील विविध विकासकामांसाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आमदार मोहन मते, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. दिनेश नंदनवार यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी नाग नदी स्वच्छता प्रकल्पाच्या कामांची माहिती घेऊन सर्व विभागांनी एकत्र येऊन तांत्रिक अडचणी सोडवाव्या असे निर्देश दिले. नागपूर शहर एनएमआरडीए परिसराचा एकत्रित प्रकल्प करून नदीत पुढे अस्वच्छ पाणी जाणार नाही, याचीही काळजी घेण्यात यावी, असे मंत्री महोदय म्हणाले. नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाचे आर्थिक आणि तांत्रिक मूल्यांकन पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी ना. श्री. नितीन गडकरी यांना दिली. शहरातील जलकुंभ आणि पाणी पुरवठ्याचा आढावा देखील त्यांनी घेतला. यावेळी ऑरेंज सिटी स्ट्रीट विकसित करण्याच्या प्रकल्पामध्ये निविदा काढण्यात दिरंगाई करू नये, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. दही बाजार, लोहाओळी, पोहा ओळी, अनाज बाजार, हरी गंगा, कॉटन मार्केट, संत्रा मार्केट, नेता मार्केट, डिक दवाखाना या विकास या विकास प्रकल्पांचे डिझाईन अंतिम टप्प्यात असून त्याच्याही निविदा लवकरच काढण्यात येतील, अशी माहिती ना. श्री. नितीन गडकरी यांना देण्यात आली. रामजी पहेलवान रस्ता, एलआयसी चौक, जुना भंडारा रोड येथील भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू करावी तसेच रेल्वे स्टेशन मार्गावरील दुकानदारांची कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था करावी, असेही निर्देश ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

महामेट्रोच्या व्हॉट्सऍप तिकीट प्रणालीचे उद्घाटन

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते यावेळी महामेट्रोच्या व्हॉट्सएप तिकीट प्रणालीचे उद्घाटन झाले. या प्रणालीमुळे बसल्या जागेवर तिकीट काढणे शक्य होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *