राजुभाऊ पारवेंकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
नागपुर समाचार :- नागपूर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर दौऱ्यावर आले असता माजी आ. राजुभाऊ पारवे यांनी भेट घेऊन शिक्षण, आरोग्य व सामाजिक अशा अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन देत सविस्तर चर्चा केली. तसेच ‘परमात्मा एक’ पावडदौना मौदा आश्रमाच्या विकासासाठी ७७.५३ कोटी रुपये निधी मिळावा यासाठीही साकडे घातले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार दि. २४/६/२०२४ रोजी नागपूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान माजी. आ. राजुभाऊ पारवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत अनेक अनेक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यात प्रामुख्याने ‘परमात्मा एक’ पावडदौना मौदा आश्रमाच्या विकासासाठी ७७.५३ कोटी रुपये निधी मिळावा यासाठी निवेदन देऊन साकडे घातले.
तसेच उमरेड व भिवापूर तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून उमरेड शहरात विद्यार्थ्यांसाठी १०० तर भिवापूर येथे विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी प्रत्येकी १०० खाटांच्या वस्तीगृहाच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली.
उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध नसून तालुक्यातील रुग्णांचे हाल होतात. तरी सदरील रुग्णालयास विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा यासह सुरगाव येथे होऊ घातलेला कत्तलखाना तातडीने रद्द व्हावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.
उमरेड नगर परिषद, कुही नगर पंचायत, भिवापूर नगर पंचायत येथे वैशिष्ट्ये पूर्ण योजने अंतर्गत विविध कामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देण्यासह राजूभाऊंनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.