वेदिक-महिंद्रा कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
नागपूर समाचार :- आपल्या प्रदेशाची गरज लक्षात घेऊन भविष्यात कोणते तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त आहे, याचा विचार करा आणि त्यानुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी औद्योगिक कंपन्यांना केले
विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन, महिंद्रा ट्रॅक्टर्स, यंत्र इंडिया लिमिटेड यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या वेदिक-महिंद्रा कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू करण्यात आलेल्या या अद्यावत सुविधांनी युक्त केंद्राचीही ना. श्री. गडकरी यांनी पाहणी केली.
विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन, महिंद्रा ट्रॅक्टर्स, यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या प्रयत्नांनी आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) च्या पाठिंब्याने हा प्रकल्प साकार झाला आहे. यावेळी अलायन्स ऑफ इंडियन एमएसएमई (एआयएम) चे संस्थापक अध्यक्ष आणि भारत सरकारच्या एमएसएमईचे माजी सचिव दिनेश राय, एनएसडीसी नवी दिल्लीच्या उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटणकर, महिंद्रा ट्रॅक्टर्स, एम अँड एम लिमिटेडचे मॅन्युफॅक्चरिंगचे सीनियर व्हीपी नचिकेत कोडकणी, यंत्र इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अंजनकुमार मिश्रा, व्हीडीआयएचे अध्यक्ष मेजर जनरल अनिल बाम, वेदिकचे अध्यक्ष दिलीप गोंडनाळे,
व्हीआयडीए-वेदिकचे संयोजन दुष्यंत देशपांडे, एनएसडिसी कन्सल्टन्ट डॉ. कपिल चांद्रायण आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आपल्या भागात ज्या मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे, त्यानुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल.’
देशाला पेट्रोल-डिझेलमुक्त करण्याचे आपले ध्येय असल्याचे सांगत नितीन गडकरी यांनी डिफेन्सच्या लाभाकरिता आऊटर रिंगरोडवर लवकरच नवीन तंत्रज्ञानाने युक्त १३२ आसनक्षमता असलेली ट्रॉली बस सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता कस्तुरे यांनी तर आभार प्रदर्शन दुष्यंत देशपांडे यांनी केले.