नागपूर समाचार : “परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा देशात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. राज्याच्या समतोल विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आजवर नक्षलवादी जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आता आम्ही मिटवून उद्योग नगरीचा जिल्हा म्हणून नावारूपास आणत आहोत असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
दैनिक लोकमतच्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. वनामती सभागृहामध्ये आयोजित या समारंभात इंडिया टुडेचे संपादक प्रभू चावला, दैनिक लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, माजी मंत्री नितीन राऊत, दैनिक लोकमतचे संपादक श्रीमत माने व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित उद्योजक शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी पुढे सरसावत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
दैनिक लोकमतने पत्रकारितेसमवेत क्रिडा व सामाजिक क्षेत्रात अपूर्व योगदान दिले आहे. संपादकांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार लोकमतच्या सामाजिक बांधिलकीचे व संपादकांप्रती कृतज्ञतेचे द्योतक ठरले आहे या शद्बात त्यांनी गौरव केला.
यावेळी राज्यस्तरीय पत्रपंडित पद्यश्री पां. वा. गाडगीळ आणि पत्र महर्षी म.य. दळवी स्मृती पुरस्कारांचे वितरण उद्योगमंत्री उदय सामंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.