उद्योग विभागातर्फे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन
नागपूर समाचार : राज्याचे धोरण उद्योगस्नेही आहे. उद्योगांना गुंतवणूक वाढ, प्रकल्प विस्तारासाठी सहकार्य करण्यावर शासनाचा भर आहे. उद्योजकांनीही आपली जबाबदारी ओळखून स्थानिकांच्या रोजगार संधी आणि हिताला प्राधान्य द्यावे यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आज केले.
उद्योग विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती व्हावी यासाठी इग्नाईट या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन वनामती येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ठोंबरे बोलत होते. यावेळी उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार यांच्यासह उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आदी उपस्थित होते.
भूमिपूत्रच उद्योगांच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी धावून येतात. त्यांच्या हिताच्या गोष्टींनाही प्राधान्य दिले गेले पाहिजे. राज्याच्या औद्योगिक विकासात जिल्हा हा घटक महत्वपूर्ण आहे. नागपूर जिल्ह्यातही उद्योगस्नेही विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण निर्मितीचा प्रयत्न असून उद्योगस्नेही धोरणास जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य राहणार असल्याचे श्री. ठोंबरे यांनी उद्योग परिषदेदरम्यान सांगितले.
एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढवणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन, उपक्रम व निर्यातवृद्धीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाचे विविध विभाग, त्यांचे उपक्रम व योजना राज्यात राबवित आहेत. त्यादृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रास्ताविकात सहसंचालक गजेंद्र भारती यांनी दिली.
या कार्यशाळेस निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.