नागपूर समाचार :- फक्त शैक्षणिक पदवीचे शिक्षण आवश्यक नाही. शिक्षणातून मिळणारे ज्ञान जीवनात आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. कारण जीवनाची परीक्षा हीच सर्वांत मोठी परीक्षा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्था आणि मातोश्री अनुसया महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक रमेश फुले, अध्यक्ष अर्चना फुले, तुषार व मोहित फुले , प्राचार्य श्री. खोब्रागडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. कारण शिक्षणात जीवन बदलण्याची, गरीबी आणि उपासमारी संपविण्याची ताकद आहे. शिक्षणातून आपल्या जीवनाला ऊर्जा मिळते. या शिक्षणाच्या जोरावर आज आपल्या देशातील डॉक्टर्स, सॉफ्टवेअर इंजिनियर्स जगभरात आघाडीवर आहेत.
अमेरिका, इंग्लंडसारख्या राष्ट्रांनी त्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी दलित, पीडित, शोषित समाजात शिक्षणाचा प्रचार-प्रसार कण्यासाठी जीवन समर्पित केले. त्यामुळेच हे घडू शकत आहे, असेही ते म्हणाले.
सुशिक्षित व्हाल, पण…
शिक्षण घेतल्यावर तुम्ही सुशिक्षित व्हाल, पण सुसंस्कृत व्हाल, याची खात्री कुणीच देऊ शकणार नाही. त्यासाठी जीवन मूल्ये जोपासावी लागतील. डॉक्टर, इंजिनियर व्हा, पण त्याहीपेक्षा चांगले व्यक्ती होणे जास्त महत्त्वाचे आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.