माझा अनुभव :- माझे नाव सौ. योगिनी रविजी लिखार आहे. आज मी “माझा अनुभव” या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव ‘परमेश्वरी कृपेचा पहिला अनुभव’ सादर करीत आहे.
माझे पती मार्गातील सेवक असल्यामुळे लग्नानंतर मी मार्गाचा स्वीकार केल्यावर मला आलेला माझा अनुभव व्यक्त करते. लग्नाअगोदर मला मार्गाबद्दल तितकी माहिती नव्हती. पण हळूहळू माझे सासू-सासरे, पती आणि मार्गदर्शक यांच्याकडून मला मार्गाबद्दल माहिती मिळाली. मी व माझे पती, आम्ही लग्नानंतर लगेचच त्यागाचे कार्य पण घडविले होते. लग्नानंतर आम्ही दोघेही पुण्याला आलो. कारण माझ्या पतींची नोकरी पुण्याला होती. मी तशी लग्नाअगोदर खाजगी बँकेत होम लोन खात्यात नोकरी करायची व लग्नानंतर मी पुण्यात ह्याच बँकेच्या क्षेत्रात नोकरी शोधत होती. मला काही महिन्यातच जुन्या ऑफिसच्या लोकांच्या ओळखीने नोकरी सुद्धा मिळाली परंतु आमच्या घरापासून थोडी लांब होती. तरी मी तिथं नोकरी सुरु केली.
ऑफिसचे वातावरण तितके बरं नव्हतं. ऑफिसचे कार्यकारी कर्मचारी सतत पार्ट्या, दारू पिणे, इतर वाईट व्यसनच्या गोष्टी करायचे. ऑफिस सुटल्यावर सायंकाळी दारू पिणे, पार्ट्या करणे सुरू असायचं. दुसऱ्या दिवशी पण ऑफिस मध्ये पुन्हा त्याच दारूच्या गोष्टी सुरू असायच्या. ऑफिसचे अंतर पण घरापासून भरपुर लांब होते. ऑफिसचे अंतर आणि कार्यकारी कर्मचारी यांची वर्तवणूक अशा सगळ्यांना कंटाळून मी नोकरी सोडली.
मी रोज भगवंताला विनंती मध्ये योग मागणे सुरू केले की, “मला माझ्या घराजवळ जायला यायला सोयीस्कर व ऑफिसचे कार्यकारी लोकं चांगले असलेली नोकरी मिळू द्या”. मला ४ ते ५ महिने वाट बघावी लागली. भगवंताच्या कृपेने जसे शब्द दिले, तशीच नोकरी मला घरापासून अगदी जवळ ऍक्सिस बँकेत मिळाली व ऑफिसचे कार्यकारी कर्मचारी पण खुप छान मिळाले.
या अनुभवातून मला ‘इच्छा अनुसार भोजन‘ या चौथ्या तत्वाचे अनुभवरूपी ज्ञान मिळाले म्हणायला हरकत नाही. हा माझ्या मार्गात आल्यानंतरचा एक मोठा अनुभव आहे. आपण भगवंताला जे काही दृढ मनाने मागतो, भगवंत त्यावर आपल्याला आपल्या कर्म आणि योग्यतेनुसार फळ देतो आणि दुःखाचे निवारण सुद्धा करतो. यासाठी आपल्याला फक्त त्या परमेश्वरास हवे असलेले तत्व, शब्द व नियम यांना आचरणात आणणे अनिवार्य आहे.
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर “भगवान बाबा हनुमानजी” व “महानत्यागी बाबा जुमदेवजी” यांना क्षमा मागते.
नमस्कार…