◾समाजकल्याण आयुक्त मडावी यांनी दिली मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष अहीर यांना माहिती
◾15 ऑगस्ट पासून सुरू होणार ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह
गडचिरोली समाचार : राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासाठी राज्यातील ओबीसी बांधवांकडून प्रत्येक जिल्ह्यात ओबीसींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे अशी मागणी केली जात होती. दरम्यान, जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी मंंजूर केलेले ओबीसी वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन १५ ऑगस्टपासून ओबीसी विदद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त सचिन यांनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्यासमक्ष भाजपाच्या शिष्टमंडळाला दिली.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर मंगळवार, १६ जुलैला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, रमेश भुरसे आदींनी ओबीसी वसतिगृहासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी जिल्हा समाज कल्याण आयुक्त सचिन मडावी यांना बोलावून घेत ओबीसी वसतिगृहाच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आयुक्त मडावी यांनी जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात सुरू असलेल्या बाबींचा आढावा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांच्यासमक्ष सादर केला.
राज्य शासनाने डिसेंबर २०२३ मध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यात मुलामुलींकरिता ७२ वसतिगृहाला मंजूर दिली. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात मुलींसाठी व मुलांसाठी दोन वसतिगृह येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी स्वतंत्र वेगवेगळ्या दोन ठिकाणी मुला-मुलींकरिता वसतिगृहासाठी इमारती भाडे तत्वावर घेण्यात आल्या आहेत. शासकीय निकषानुसार सर्व सोपस्कार पार पडले असून वसतिगृहाच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त मडावी यांनी दिली. ही स्थिती राज्यातील सर्वच जिल्ह्यात सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात मागील काही दिवसांपूर्वी मंत्रीमहोदयांनी सुरू शैक्षणिक सत्रापासून ओबीसी वसतिगृह सुरू करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार कार्यवाही करण्यात आली असल्याचीही माहिती त्यांनी उपस्थित भाजपाच्या शिष्टमंडळाला दिली.
वसतिगृहासाठी अर्ज करण्याची ३१ जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या वेळेत समाधानकारक अर्ज प्राप्त झाले नाही. २१ जुलैपर्यंत देण्यात आलेल्या मुदत कमी असल्याचे लक्षात घेऊन ३१ जुलैपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. वसतिगृहासाठी आवश्यक असलेले साहित्य पोहचताच वसतिगृह तत्काळ सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तरीही १५ ऑगस्टपर्यंत वसतिगृह सुरू करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी ओबीसी समाजाकडून राज्य शासनाचे व उपमुख्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या आभार मानले.
– सचिन मडावी (समाज कल्याण आयुक्त, गडचिरोली)
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली दखल
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस २२ जून रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी ओबीसी वसतिगृह तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज कल्याण आयुक्त मडावी यांना मंत्रालयात बोलावून घेत सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर तत्काळ वसतिगृह सुरू करण्याचे निर्देश दिले.
वरिष्ठ पातळीवरून सर्व हालचाली आठ दिवसात पूर्ण करण्यात आल्या व राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आले. वसतिगृहासाठी लागणारे मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती आहे.