- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : देशातील सर्वात अत्याधुनिक ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ नागपुरात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नागपूर समाचार : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड व नागपूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थापित ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’चे बुधवारी (ता.१७) उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. नागपुरात स्थापन करण्यात आलेले ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ हे देशातील सर्वात अत्याधुनिक सेंटर असल्याचे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

पोलीस कंट्रोल रूम परिसरात निर्माण करण्यात आलेल्या ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’च्या लोकार्पण सोहळ्यात आमदार श्री कृष्णा खोपडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहपोलिस आयुक्त श्रीमती अश्वती दोरजे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आंचल गोयल आदी उपस्थित होते. प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’चे लोकार्पण केले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ची पाहणी करून त्याच्या कार्यशैलीची माहिती जाणून घेतली. पुढे आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, पोलिस प्रशासनाला गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.

शहरात नागपूर स्मार्ट सिटीद्वारे लावण्यात आलेल्या ३६०० सीसीटीव्ही कॅमेरा व्यतिरिक्त मेट्रो, मॉल आणि इतर ठिकाणाचे २२०० कॅमेरा देखील ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’मध्ये जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता नागपूर पोलिसांच्या नजरेतून कोणताही गुन्हेगार सुटणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देशातील ब्रिटीशप्रणीत कायदे बदलविण्यात आले आहेत. नवीन कायद्यामुळे नागरिकांना जलद न्याय मिळणार आहे तर पोलिस यंत्रणेच्या तपासातही गती येणार आहे, असाही विश्वास उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कमांड अँड कंट्रोल सेंटरची संपूर्ण निर्मिती नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका मुख्यालयात स्थित श्रध्येय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपेरेशन सेंटरमध्ये यापुर्वी मनपा, पोलीस विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाकडून संयुक्तरित्या नियंत्रण ठेवले जात होते. आता ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’मधून पोलीस विभाग आणि वाहतूक पोलीस विभाग स्वतंत्ररित्या शहरातील गुन्हे आणि वाहतुकीचे नियंत्रण ठेवणार आहेत. मनपातील श्रध्येय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपेरेशन सेंटरमधून शहरातील नागरी सुविधा, आपत्ती व्यवस्थापन संदर्भात नियंत्रण ठेवले जाणार आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. ते म्हणाले की, श्रध्येय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपेरेशन सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत २६ हजार बेजबाबदार वाहनचालकांना चालान पाठविण्यात आले आहे. तर ३ हजारपेक्षा जास्त गुन्हेगारीच्या घटना उघडकीस आणण्यास मदत झाली आहे. यासोबतच आता नवीन ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’च्या माध्यमातून मोबाईल सर्व्हिलन्स व्हेहीकल आणि ड्रोन कॅमेराद्वारे नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. ‘आर्टीफिशिअल इंटेलिजन्स’वर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता सायबर गुन्ह्यांमध्ये आवाजावरुनही गुन्हेगाराचा तपास केला जाउ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सिम्बा’ (सिस्टीम इंटिग्रेटेड फॉर मॉनिटरिंग अँड बिग डेटा ॲनालिटिक्स ॲपचे देखील लोकार्पण झाले. यावेळी सायबर क्राईम व चोरीच्या गुन्ह्यातील तपासामध्ये प्राप्त झालेला मुद्देमालाचे संबंधित नागरिकांना हस्तांतरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. नागपूर शहर पोलिसच्या अद्ययावत संकेतस्थळाचे देखील त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त पोलिस आयुक्त सर्वश्री संजय पाटील, प्रमोद शेवाळे, शिवाजी राठोड, पोलिस उपायुक्त निमित गोयल, नागपूर स्मार्ट सिटीचे संचालक अनिरूद्ध शेणव‌ई, आशीष मुकीम, नेहा झा, भानुप्रिया ठाकूर, डॉ. शील घूले, राजेश दुपारे, राहुल पांडे, एल अँड टी चे स्मार्ट इन्फ्रा बिझनेस प्रमुख सी. चोक्कलिंगम, अजय रामटेके उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन पोलिस निरीक्षक कविता इसारकर यांनी केले तर आभार सहपोलिस आयुक्त श्रीमती अश्वती दोरजे यांनी मानले.

कमांड अँड कंट्रोल सेंटरची वैशिष्ट्ये 

– नागपूर शहरात लावलेल्या ३६०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे एकत्रीकरण 

– एमएसव्ही वाहन फीड आणि ड्रोन लाइव्ह फीड

– मेट्रो, मॉल, सराफा बाजार यासारख्या महत्वाच्या ठिकाणी कम्युनिटी कॅमेरा इंटिग्रेशन

– ‘सिम्बा’ (सिस्टीम इंटिग्रेटेड फॉर मॉनिटरिंग अँड बिग डेटा ॲनालिटिक्स ॲप

– अल पॉवर्ड बिग डेटा विश्लेषण आणि गुन्हेगारी शोध तंत्रज्ञान. क्रिमिनल डॉसियर अपलोड करणे आणि शोधणे

– ‘एआय’ फेशियल रेकग्निशन समर्थित गुन्हेगारी शोध, ऑडिओ डेटा कॅप्चरिंग आणि प्रगत ‘एआय’ पॉवर ॲनालिटिक्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *