- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ‘ॲाक्सिजन पार्क’ची घोषणा; नागपुरात साकारतेय अनोखे डेस्टिनेशन

गडकरी म्हणाले, ‘ती फळं तुमच्यासाठी नाहीत’!

नागपूर समाचार :- नितीन गडकरी म्हणजे शेकडो अनोख्या कल्पनांचा भंडार होय. पण एखादी कल्पना त्यांना सूचली की, ती प्रत्यक्षात उतरलीच समजा. त्यांची अशीच एक नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. पुढील महिन्यात या अनोख्या डेस्टिनेशनचे उद्घाटन होईल.

जामठानजिक आऊटर रिंगरोडवर ‘ॲाक्सिजन आणि बर्ड पार्क’ निर्माण होत आहे. तो जवळपास पूर्ण झाला आहे. पुढील महिन्यात त्याचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा खुद्द गडकरींनीच आज केली. पूर्णपणे पक्ष्यांसाठी समर्पित असा ‘बर्ड पार्क’ आणि सर्वसामान्य नागरिकांना शुद्ध हवा देणारा ॲाक्सिजन पार्क अशी अनोखी भेट पुढील महिन्यात नागपूरकरांना देणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. 

ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थ पर्यटनासाठी आज आणखी एक इलेक्ट्रिक बस दाखल झाली. त्याचे उद्घाटन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी ‘ॲाक्सिजन पार्क’ची माहिती दिली. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जामठा परिसरातून जाणाऱ्या आऊटर रिंगरोडवर हा ॲाक्सिजन पार्क निर्माण केला आहे. गडकरींच्या संकल्पनेतून हा पार्क साकारण्यात आला आहे. त्यामुळे दिव्यांग पार्कनंतर आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण नागपूरकरांसह पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे. 

काय असेल पार्कमध्ये

या पार्कमध्ये एक कॅफे, सायकल ट्रॅक, फक्त पक्ष्यांसाठी असलेली फळझाडे आदींचा समावेश असेल. येथील फळांवर फक्त पक्ष्यांचा अधिकार असेल. तुम्हाला ती खाता येणार नाहीत, असेही गडकरींनी सांगितले. 

नागपूर ते माहूर धावणार इलेक्ट्रिक बस

ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे नवीन इलेक्ट्रिक बस ज्येष्ठांना धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या सहलीसाठी देण्यात येईल. नागपूर ते माहुर असा प्रवास ही बस करेल. विशेष म्हणजे ही बस निःशुल्क तत्वावर चालविण्यात येणार आहे. एका चार्जिंगमध्ये अडीशे किलोमीटरचा प्रवास करण्याची बसची क्षमता आहे. 

२६ हजार ज्येष्ठांना लाभ

ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानला गडकरींकडून यापूर्वी एक ॲालेक्ट्रा कंपनीची आणि अशोक ले-लँड कंपनीची एक डबल डेकर बस मिळाली आहे. या दोन्ही बसच्या माध्यमातून आतापर्यंत २६ हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी शेगाव, आदासा, रामटेकसह विदर्भातील अनेक धार्मिक भागांचे पर्यटन केले आहे, अशी माहिती गडकरींनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *