- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : भांडेवाडीतील वस्तींमध्ये तात्काळ पंचनामे करण्याचे आयुक्तांचे निर्देश

घटनास्थळी तत्काळ भेट देऊन आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी नागरिकांशी साधला संवाद

नागपूर समाचार : भांडेवाडी परिसरातील वस्तींमध्ये झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून, नागरिकांना त्वरित लाभ देण्यात यावा असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

शनिवारी (ता: २०) सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडेवाडी येथील भिंत तुटल्याने जवळपासच्या सूरज नगर, अंतूया नगर, तुळशी नगर परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असून, घटनेची माहिती मिळताच मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.

याप्रसंगी उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, राजेश दुफारे, सहायक आयुक्त घनशाम पंधरे, माजी नगरसेविका आभा पांडे, माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, स्वच्छता विभागाचे रोहिदास राठोड यांच्यासह स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वप्रथम मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भांडेवाडी येथील तुटलेल्या भिंतीचे निरीक्षण केले. नंतर सुरज नगर, अंतूया नगर, तुळशी नगर परिसरात ज्याठिकाणी घरांमध्ये पाणी आणि कचरा पसरला आहे अशा ठिकाणी भेटदेत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी भिंत तुटून घरात आलेल्या कचऱ्याला लवकरात लवकर स्वच्छ करावे, पावसाच्या पाण्यामुळे चोक झालेली गटर लाईन त्वरित दुरुस्त करावी, तुटलेल्या भिंतीला रेतीच्या बोऱ्यांनी बंद करुन भिंतीजवळ 15 फुटाचा बफर झोन तयार करुन, पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळी नाली तयार करावी, नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे, आदी निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आयुक्तांच्या निर्देशानुसार, भांडेवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरज नगर परिसरात क्लोरीन टँबलेटचे वितरण करण्यात आले. तसेच परिसरात स्वच्छतेचे कार्य करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *