नागपूर समाचार :- ग्रामिण विकास, शेतीची समृद्धता आणि संरक्षण यंत्रणेला अधिक बळकट करण्यासाठी घेतलेला पुढाकार अशा अनेक वैशिष्ट्यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प खास ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकसीत भारताच्या संकल्पपूर्ती वाटचाल करतो आहे. विकसीत भारताची ही वाटचाल अधिक सशक्त करणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रीया माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे.
त्यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करीत सर्वसामान्याच्या हिताला प्राधान्य दिल्याबाबत त्यांचे आभारही मानले.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवरील औषधांची किंमत कमी करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हा अत्यंत स्तुत्य आणि महत्वाचा निर्णय आहे. याशिवाय नवीन कर प्रणालीने ‘वन नेशन वन टॅक्स सिस्टिम’ ही सर्वकल्याणकारी संकल्पना लागू होत आहे. याशिवाय देशाचा आधारस्तंभ असलेल्या शेतकरी बांधवांच्या उत्थानाच्या कक्षा अधिक वृंदावणारा हा अर्थसंकल्प आहे. तरुण आणि महिलांकरिता अनेक संधीची दारे उघडण्यात आली आहेत.
देशातील पर्यटन विकासाला चालणा देऊन त्यातून रोजगार आणि गुंतवणुकीचा मार्ग प्रशस्त करण्याचा निर्णय हा दुरदर्शी निर्णय असून अर्थसंकल्पातून गरीब, मध्यमवर्गीय, सर्वसामान्यांच्या कल्याणाला प्राधान्य देण्यात आल्याचे देखील माजी महापौर संदीप जोशी म्हणाले.