योजनेचे उद्योग जगताकडून उत्स्फूर्त स्वागत
नागपूर समाचार : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना एक अभूतपूर्व संधी उपलब्ध झाली आहे. आपल्या शैक्षणिक पदवी अथवा पदविकासह प्रत्यक्ष कार्यानुभवाची जोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आवश्यकते धैर्य निर्माण होत नाही. विद्यावेतनासह अनुभवाची बेरोजगारांना मिळालेली ही अपूर्व संधी आहे. याचबरोबर उद्योग जगतालाही आपल्याला आवश्यक असेल तसे मनुष्यबळ या नव्या अभिनव योजनेतून उपलब्ध होत असल्याने याला अधिक सकारात्मक उर्जेची जोड मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाने लोक कल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून नुकत्याच घेतलेल्या या महत्वपूर्ण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आज नागपूर मधील विविध औद्योगिक क्षेत्रातील प्रमुखांसमवेत त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, असोशिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कार्पोरेशन नागपूरचे अध्यक्ष आशिष काळे, ॲडव्हांटेज विदर्भचे विश्वस्त राजेश रोकडे, प्रशांत उगेमुगे, हॉटेल मॅनेजमेंटचे तेजींदर सिंग, बुटीबोरी इंडस्ट्रीयल असोशिएशनचे प्रशांत मेश्राम, बैद्यनाथचे श्री शर्मा व इतर उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आजच्या स्थितीत सुशिक्षित बेरोजगारांकडे अनुभव हा कळीचा मुद्दा आहे. मख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून हा प्रश्न आता दूर झाला असून बेरोजगारांना या सहा महिन्याच्या अनुभवातून उद्याच्या उज्ज्वल यशाचा पाया भक्कम करता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. या योजनेसाठी खाजगी कंपन्यांना आपल्याकडे सामावून घेता येऊ शकेल एवढ्या मनुष्यबळाची उपलब्धी करुन दिली जाणार आहे.
यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index महास्वयंम या संकेतस्थळावर नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. ही रिक्त पदे पोर्टलवर नोंदविण्यासाठी नागपूर येथील विविध उद्योग जगत स्वयंस्फूर्त पुढे येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. ऑनलाईन फॉर्म भरतांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी नागपूर येथे मिहान, बुटीबोरी व हिंगणा येथे विशेष कॅम्पचे आयोजन लवकरच केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
ज्यांना रोजगार द्यायाचा आहे त्यांच्यामध्ये आपल्या उद्योग कंपन्यांबाबत आवश्यकते कौशल्य असणे याबाबत विविध उद्योगांच्या आस्थापनेत नेहमी साशंकता असते. दुसऱ्या बाजुला बेरोजगारांना प्रत्यक्ष अनुभवाची पुरेशी संधी मिळणे क्रमप्राप्त राहते. बेरोजगार व उद्योजक यांच्यामध्ये ही योजना एक सुवर्णमध्य साध्य करुन देणारी असल्याचे प्रतिपादन ॲडव्हांटेज विदर्भचे विश्वस्त राजेश रोकडे यांनी केले. अनुभवासमवेत वेळेची किंमत, शिस्त याचे अप्रत्यक्ष कौशल्य बेरोजगारांमध्ये निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.
योजना जेव्हा जाहीर झाली तेव्हा एकप्रकारची मनात भिती होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या योजनेतील सर्व बारकावे समजून सांगितल्यामुळे आमची ही भिती दूर झाली. याच बरोबर उद्योजक व बेरोजगार यांच्या परस्पर हिताची ही एक अत्यंत महत्वपूर्ण योजना असल्याने आम्हाला अधिक आनंद झाल्याची प्रतिक्रिया असाशिएशन ऑफ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे प्रशांत उगेमुगे यांनी दिली. ज्यांना रोजगार द्यायचा आहे त्यांच्यामध्ये या योजनेबाबत अधिक आशादायक वातावरण निर्माण झाल्याचे आशिष काळे म्हणाले.