नागपूर समाचार : शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी वृक्षारोपणावर भर द्यावा, अशा सूचना नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. मंगळवारी (ता:२३) शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मनपाद्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा मनपा आयुक्तांनी आढावा घेतला. त्यांनी विविध विभागांना वायु गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्याचे ही निर्देश दिले.
मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, उज्जवल लांजेवर कार्यकारी अभियंता अल्पना पाटने, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार डॉ. संदीप नारनवरे, डॉ. गीतांजली कौशिक, सार्वजनिक आरोग्य अभियंता संदीप लोखंडे, प्रकल्प अधिकारी राऊत, गभने आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपाच्या विविध विभागांद्वारे प्रस्तावित विविध कामांना विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशित केले. तसेच शहरातील हरीत क्षेत्राच्या विकासासाठी उद्यान विभागाद्वारे पावसाळ्यात सर्वत्र वृक्षारोपण करण्यावर भर द्यावा, वायू गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने मनपाद्वारे विविध कामांचे कार्यादेश प्रदान करण्यात आलेले आहेत. तर अनेक कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. या सर्व कामांकडे प्राधान्याने लक्ष देऊन तातडीने पूर्णत्वास नेण्या संदर्भात आयुक्तांनी निर्देश दिले. याशिवाय अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्येक्ष पाहणी करावी असे देखील आयुक्तांनी निर्देशित केले.
जयताळा आणि फ्रेन्ड्स कॉलनी येथील दहनघाट विकसीत करण्याचे काम पूर्ण झाले असून, चिंचभुवन दहन घाटाचे कार्य जवळजवळ प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रकल्प विभागाद्वारे सादर करण्यात आली. यावेळी सल्लागार डॉ. गीतांजली कौशिक यांनी आपल्या संगणकीय सादरीकरणाद्वारे शहरतील हॉटस्पॉट आदी ठिकाणाची माहिती दिली.