- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : शब्द सुरांनी ओथंबलेला..”गजर विठ्ठलाचा”

नागपुर समाचार : नागपूरच्या सुप्रसिद्ध संस्कृती इव्हेंटस् तर्फे नुकताच सायंटिफिक सभागृहात आषाढ मास समाप्ती होत असतानाच परत एकदा पंढरपूर अवतरल्याचा भास उपस्थित रसिकांना झाला. गुणवंत घटवाई, डॉ सौ मंजिरी वैद्य अय्यर, सौ श्रेया खराबे टांकसाळे आणि सदाबहार मुकुल पांडे यांनी विविध भक्ती रचना अत्यंत दमदार रीतीने सादर करुन उपस्थितांचे मन मोहून टाकले. पारंपरिक विठ्ठल भक्तीचा मळा फुलावणाऱ्या रचनांचा आनंद देतानाच काही खास फर्माईशीच्या रचना सादर करुन त्यांनी बहार उडवून दिली.

परंपरागत भैरवीचे स्वर जीवाला कातर करून गेले, तेव्हाच कार्यक्रम संपल्याची जाणीव रसिकांना झाली. ह्या सर्व गायकांना परिमल जोशी ह्यांच्या संगीत संयोजनाच्या नेतृत्वात अशोक टोकलवार तबला, श्रीधर कोरडे मृदुंग, सुभाष वानखेडे ऑक्टोप्याड, विक्रम जोशी पूरक तालवाद्य, अमर शेंडे व्हायोलिन, श्रीकांत पिसे हार्मोनियम ह्यांनी दमदार साथसंगत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन किशोर गलांडे ह्यांनी नेहमी प्रमाणे खुसखुशीत आणि रंगतदार केले.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी संस्कृती इव्हेंटस् आणि संकल्पना निर्मितीकार सौ. पीयाली बिस्वास ह्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गिरिशजी देशमुख यांचे स्वागत केले, मुख्य प्रायोजक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विवेक कुणावार ह्यांचेप्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि संस्कृती इव्हेंटस् बद्दल माहिती दिली. मध्यंतरात विवेक कुणावार आणि सौ. वैभवी कुणावार ह्यांनी सर्व कलाकारांचा यथोचित सन्मान केला. कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक उपस्थितांचे दरावरच वैष्णव टिळा लावून आणि पेढ्याचा प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *