नागपूर समाचार :- मलनि:स्सारण वाहिन्यांच्या स्वच्छतेमध्ये दिरंगाई झाल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने नागरी सुविधेसाठी आणखी ७ सक्शन कम जेटिंग मशीन मागविल्या आहेत. सोमवार (ता.२९) पासून या सक्शन मशीन नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या आहेत.
पावसाळ्यात मलनि:स्सारणाच्या वाढत्या तक्रारींचे त्वरीत निराकरण व्हावे व नागरिकांना दिलासा मिळावा या हेतूने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नवीन सक्शन मशीन मनपा सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला. मनपाकडील सक्शन जेटिंग मशीनची संख्या आता २१ होणार आहे.
नवीन सात सक्शन मशीनपैकी ३ मशीन आधीच नागपूर शहरात दाखल झालेली आहेत. तर उर्वरित येत्या १० दिवसांत दाखल होण्याची अपेक्षा आहे. मनपाकडे सुरूवातील १० झोनकरिता प्रत्येक एक जेटिंग मशीन होते. महापालिकेने २०१० साली प्रथमच ३००० लिटर क्षमतेच्या २ सक्शन मशिनसाठी निविदा मागवल्या होत्या. त्यानंतर २०११-१२ मध्ये २ रिसायकलरसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. शहरात २०१८ पर्यंत २ रिसायकलर होते. त्यांची संख्या २०२३ पर्यंत ५ पर्यंत आली. शहरातील अरुंद आणि गर्दीच्या वस्त्यांमध्ये सेवा देण्यासाठी मनपाद्वारे ३ लहान सक्शन कम जेटिंग मशीन भाडेतत्वावर घेण्यात आल्या होत्या, ही माहिती सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी दिली.
पावसानंतर होणारे प्रचंड गाळ आणि नागरिकांच्या परिसरात दूषित पाणी साचण्यापासून दिलासा देण्यासाठी मनपा आयुक्तांनी १० हजार लीटर क्षमतचे ३ मोठे आणि ३००० हजार लीटर क्षमतेचे १ लहान सक्शन कम जेटिंग मशीन घेण्याचा निर्णय घेतला. आता एकूण २१ सक्शन जेटिंग मशीनद्वारे शहरात मलनि:स्सारणाची स्वच्छता केली जाणार आहे. यासाठी वेळापत्रक तयार केले जाईल. त्यामुळे प्रत्येक झोनमध्ये मशीन कार्यरत करण्यात येतील. शहरातील विविध भागात सेवा देण्याच्या उद्देशाने सक्शन मशीनची संख्या वाढविण्यात आलेली आहे. यामुळे आता मलनि:स्सारण वाहिन्यांच्या तक्रारी सोडविण्यात गती येईल, असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.