कामठी तहसील कार्यालयात महसूल पंधरवाड्याचा शुभारंभ
कामठी समाचार : महसुल अधिकारी हा प्रशासनाचा कणा असून शासन व जनतेमधील महत्वाचा दुवा आहे. महसूल विभागाची नाळ शेती व शेतकऱ्यांशी जोडली आहे.जमिनीच्या विविध प्रकरणाशी निगडित असलेला आणि शेतकऱ्याच्या दैनंदिन जिव्हाळ्यांच्या प्रश्नांचा ज्यांच्याशी संबंध येतो तो महसूल विभाग असल्यामुळें त्यांच्या समस्यांचे निराकरण कालमर्यादेत करुन नागरिकांचे समाधान होईल असे संवाद घालावे असे मौलिक प्रतिपादन कामठीचे नायब तहसीलदार उपेश अंबादे यांनी कामठी तहसील कार्यालयात आयोजित महसूल दिन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. तसेच 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत कामठी तहसील कार्यालय तर्फे महसूल पंधरवाडा राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार आज 1 ऑगस्ट ला महसूल पंधरवाड्याचा शुभारंभ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रम पासून करण्यात आले. या अंतर्गत लाभार्थ्यांना माझी लाडकी बहिन योजनेसाठी आवश्यक ते दस्तावेज लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.
जसे की 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष मानले जाते तसे 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे आर्थिक वर्ष मानले जाते. यानुसार 1 ऑगस्ट हा महसूल वर्षाचा पहिला दिवस आहे. 1 ऑगस्ट महसूल दिन हा दिवस मागे वळून आपल्या कामाचे परीक्षण करण्याचा दिवस आहे.
शासनाचा मध्यवर्ती विभाग म्हणून महसूल विभाग कार्यरत आहे. जमीन, महसुल वसुली, कायदा व सुव्यवस्था राखणे, गौंणखणींज स्वामीत्वधन वसुली, अनधिकृत गौण खनिज उत्पन्नावर कारवाही, विविध खात्याची थकीत वसुली, पाणी वापर परवानगी, रस्ता देणे, अडवलेले रस्ते खुले करणे, पाण्याच्या पाईपलाईनसाठी परवानगी देणे, सर्व प्रकारच्या निवडणुका, जनगणना, आर्थिक गणना, कृषी गणना, आधार कार्ड, विविध सामाजिक योजना, रोजगार हमी योजना आदी महसूल खात्यांमार्फतच राबविले जातात.
लोकांना विकासात्मक प्रशासन द्यायची जवाबदारी महसूल विभागाची आहे. त्यामुळे लोकांच्या महसूल प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात. म्हणून सर्वांनी लोकभिमुख काम करण्याकडे कल वाढवावे असे आवाहन नायब तहसीलदार उपेश अंबादे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर, तालुका कृषी अधिकारी नंदनवार, पुरवठा निरीक्षक बालाजी घावस, तहसीलदार प्रस्तुतकार अमोल पौड, भुपेंद्र निमकर, ज्योती गोरलेवार, माधुरी उईके, सुनीता जाधव, मंगला दिवटेलवार, वैशाली मेश्राम, तेलपांडे, पंकज पंचभाई, तसेच सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी गण तसेच सुधीर चव्हाण, राम उरकुडे, कुंजीलाल पानतावणे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अव्वल कारकून व्ही पी मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन माधुरी उईके यांनी मानले.
या महसूल पंधरवाड्यात…..
1 ऑगस्ट ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना.
2 ऑगस्ट ला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना.
3 ऑगस्ट ला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना.
4 ऑगस्ट ला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय.
5 ऑगस्ट कृषी मार्गदर्शन.
6 ऑगस्ट शेती पाऊस आणि दाखले.
7 ऑगस्ट युवा संवाद.
8 ऑगस्ट ला महसूल जन संवाद.
9 ऑगस्ट महसूल ई प्रणाली,
10 ऑगस्ट सैनिक हो तुमच्यासाठी.
11 ऑगस्ट आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन.
12 ऑगस्ट एक हात मदतीचा दिव्यांग्याचा कल्याणाचा.
13 ऑगस्ट महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण.
14 ऑगस्ट महसूल पंधरवाडा वार्तालाप.
15 ऑगस्ट ला महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण करून महसूल पंधरवाडाची सांगता करण्यात येईल.