माजी विद्यार्थी मेळाव्याचे शनिवारी (३ ऑगस्ट) आयोजन
नागपूर समाचार : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समारोप समारोह निमित्त सिव्हिल लाईन्स पेधील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह येथे शनिवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता माजी विद्यार्थी मेळावा आयोजित आहे. माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील नामवंत १०० माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहेत.
माजी विद्यार्थी मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री. विकास सिरपूरकर, मा. केंद्रीय मंत्री परिवहन व महामार्ग विभाग भारत सरकार श्री. नितीन गडकरी, मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस, माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची उपस्थिती राहणार आहे.
अध्यक्षस्थान माननीय प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे भूषविणार असून प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे, माजी विद्यार्थी मेळावा समिती अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, समिती सचिव डॉ. कल्पना पांडे, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. राजेश सिंह या प्रसंगी उपस्थित राहतील.
मेळाव्यामध्ये विद्यापीठामधून ९९५३ मध्ये पदवीधर झालेले राष्ट्रीय बॅडमिंटनपटू श्री. चंद्रकांत देवरस, १९५३ मधील पदवीधर लोकमतचे संपादक कमलाकर धारप, न्यायमूर्ती आर.सी. चव्हाण, न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती वासंती नाईक, १९ माजी कुलगुरू, कला क्षेत्रातून गिरीश ओक, देवेद्र दोडके, श्री यशजी चव्हाण, श्री देवाशिष नहा, श्री पराग भावसार, अभियांत्रिकी क्षेत्रातील सोलर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल, शशिकांत चौधरी, कमल सीथा, ब्रिगेडियर प्रमोद मिश्रा, कमांडर आशुतोष रिधोरकर, कर्नल श्री रामदास बुचे, डॉ. देवयानी बुचे यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार या मेळाव्यात केला जाणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशासह संपूर्ण जगाच्या विविध भागांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर नामवंत खेळाडू, पत्रकार, न्यायाधीश, उद्योजक, भारतीय सेनेतील उच्चपदस्थ अधिकारी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता, वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुविशारद, शैक्षणिकसह आदी विविध क्षेत्रात काम करणारे कार्यरत माजी विद्यार्थी या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहे.
शिक्षण प्राप्त केल्यानंतर आपल्या क्षेत्रामध्ये लौकिक प्राप्त माजी विद्यार्थ्यांची मदत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ज्ञान संसाधन केंद्र बनविण्याकरिता घेता यावी म्हणून या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्या क्षेत्रामध्ये पारंगत असलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून त्यांना अपेक्षित असलेल्या शैक्षणिक गरजा कशा निर्माण करता येईल यावर मंथन होणार आहे.
कोणत्याही एका क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याला कौशल्य प्राप्त करता येईल अशा प्रकारे शैक्षणिक रचना तयार करीत विद्यापीठाला ज्ञान संसाधन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे पत्रकार परिषदेला माजी विद्यार्थी मेळावा समिती अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, समिती सचिव डॉ. कल्पना पांडे, डॉ. संतोष कसबेकर, डॉ. अनंत पांडे, श्री प्रमोद तिजारे, समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.