- Breaking News, PRESS CONFERENCE, आयोजन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ या कार्यक्रमाचा खास प्रयोग नागपुरात ५ ऑगस्ट रोजी

साहित्य सम्राट आचार्य प्र. के. अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी १२५वी जयंती निमित्त आयोजन

नागपुर समाचार : साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जयंतीचे १२५वे म्हणजेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्‍त ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ हा कार्यक्रम सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रात्रौ ८ वाजता कविवर्य सुरेश भट नाट्यगृह, नागपूर येथे आयोजित करण्‍यात आला आहे, अशी माहिती लेखक, दिग्‍दर्शक व निर्माते अशोक हांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मुंबईच्या ‘चौरंग’ या संस्थेतर्फे प्रस्‍तुत, या कार्यक्रमाची संकल्‍पना, लेखन, निर्मिती, दिग्दर्शक व निवेदन अशोक हांडे यांचे असून महाराष्‍ट्र शासनाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजन केले जात आहे.  

आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्‍य साधून महाराष्ट्र शासन आचार्य अत्रे यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे साजरे करीत आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा अजित पवार आणि माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून आयोजक म्हणून माननीय विकास खारगे, प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग तथा माननीय विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी जबाबदारी उचलली आहे.  

आचार्य अत्रे यांची संगीतमय जीवन गाथा

अत्रे अत्रे सर्वत्रे हा कार्यक्रम म्हणजे आचार्य अत्रे यांची संगीतमय जीवन गाथा आहे. हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते अखेरपर्यंत त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा, त्यांच्या नाटक व चित्रपटातील गाणी, कविता कथा विनोदी भाषणे, विनोदी किस्से आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या माध्यमातून मांडला जातो. शिक्षक, मुख्याध्यापक, प्रिन्सिपल, वक्ते, नाटककार, चित्रपटकार, कथा, पटकथा, संवाद लिहिणारे, नाट्यपदं आणि चित्रपटातील गाणी लिहिणारे निर्माते, दिग्दर्शक, पत्रकार, संपादक, विनोद, काव्य, साहित्य आणि आपल्या तडाखे बंद आणि विनोदी भाषणांनी महाराष्ट्राला परीचित असलेले आचार्य अत्रे म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व. राजकारणात उडी घेऊन त्यांनी पुण्याचा विकास केला व पुढे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे सेनापतीपद भूषविले आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा पुरेपूर वापर करून महाराष्ट्र घडवला. आचार्य अत्रे कोण होते? त्यांची विद्वत्ता, वक्तृत्व, राजकीय कर्तृत्व, त्यांनी शालेय अभ्यासक्रमात आणलेले ‘नवनीत वाचनमाला’, पत्रकार आणि संपादक म्हणून त्यांचे योगदान, नाटक आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेली देदीप्यमान कामगिरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी निभावलेली ऊतुंग भूमिका यांचा यात समावेश राहणार आहे.

५० कलाकारांचा सहभाग  

चौरंगचे ५० कलाकार हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार पद्धतीने सादर करतात. या कार्यक्रमासाठी आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै आणि आचार्य अत्रे यांचे नातू ॲडव्होकेट राजेंद्र पै यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून संगीत संयोजन महेश खानोलकर यांचे आहे, अशोक हांडे म्‍हणाले.   

ध्वनी संयोजन दिलीप बोनाटे यांचे असून प्रकाश योजना सुमेध कळस्कर, रंगभूषा प्रसाद ठक्कर, व्हिडीओ शैलेंद्र म्हात्रे, निर्मिती व्यवस्था मुरलीधर जाधव व उदय शेटटी यांची प्रमोद सोहोनी, सचिन मुळ्ये, रुद्रेश कानविंदे मैथिली जोशी, स्मिता जोशी आणि निलाक्षी पेंढारकर हे गायक कलाकार आणि महेश खानोलकर, नीला सोहोनी, सत्यजित प्रभू अमित गोठीवरेकर, अभिमान आपटे, मंदार पेडणेकर, अविनाश मयेकर, नारायण साळुंके, भावेश पाटील, राहुल मयेकर, गोविंद हडकर, गौतम सोनावणे, रेणूका पानसे या वादक कलाकारांचा कार्यक्रमात सहभाग आहे.  

नि:शुल्‍क प्रवेशिका येथून प्राप्‍त करा 

हा कार्यक्रम नि:शुल्‍क असून प्रवेशिका सुरेश भेट सभागृह व विष्‍णुजी की रसोई, बजाजनगर येथे उपलब्‍ध राहतील. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्‍यात आल्‍या आहेत. प्रथम येणा-या प्राधान्‍यक्रमानुसार प्रवेश दिला जाईल. 

दर्दी रसिकांनी याचा लाभ घ्यावा व महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन लेखक, दिग्दर्शक अशोक हांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *