- Breaking News, नागपुर समाचार, मनपा, स्वास्थ 

नागपुर समाचार : डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी आतापर्यंत ३२ हजार घरांचे सर्वेक्षण

नागपूर समाचार : नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य विभागाद्वारे शहरातील तापरुग्णांच्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. झोननिहाय आशा स्वयंसेविकाद्वारे सुरु असलेल्या सर्वेक्षण अभियानात आतापर्यंत ३२१२१ घरांचे सर्वे करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार झोननिहाय चमू कार्य करीत आहे.

आज शनिवार ३ ऑगस्ट रोजी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी धरमपेठ झोनमधील सर्वेक्षण कार्याची पाहणी केली. त्यांनी के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकासोबत घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण कार्याचे निरीक्षण केले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा देवस्थळे उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची देखील पाहणी केली.

सातत्याने वाढणाऱ्या पावसामुळे किटकजन्य आजारात वाढ होत आहे. अशा आजार असलेल्या ठिकाणी वेळीच आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविकांद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणामध्ये आशा स्वयंसेविका घरोघरी भेट देऊन तापरुग्णांची माहिती घेतात. याशिवाय कंटेनर सर्वे अंतर्गत घरात आणि परिसरात पाणी जमा राहणाऱ्या वस्तूंची पाहणी केली जात आहे. शुक्रवार २ ऑगस्टपर्यंत दहाही झोनमधील ३२१२१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. या घरांमध्ये ४५५७ दूषित भांडी आढळून आली. यात १२५४ कुलर, १४७ टायर, ९०० कुंड्या, ४९२ ड्रम, १६० मडके, १३३७ पक्षी व प्राण्यांची भांडी आणि २६७ इतर भांड्यांमध्ये डेंग्यूचा लारवा आढळून आला. लारवा आढळलेल्या ठिकाणी औषध टाकण्यात आले.  

घरी आणि परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा लारवा पाण्यात वाढत असल्यामुळे कुठेही पाणी जमा होऊ नये याची काळजी घ्यावी. कुलर, कुंड्या यातील पाणी दररोज बदलावे. आठवड्यात प्रत्येक शनिवारी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *