विद्यापीठाच्या शताब्दी समारोहाची सांगता
नागपूर समाचार : विद्यापीठातील सर्व घटकांमध्ये समन्वय, संवाद आणि सहकार्य राहिले तर दिशादर्शक काम होईल. आपले उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी हे सामंजस्य कसे निर्माण करता येईल याचा विद्यापीठाने विचार करावा, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) व्यक्त केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाची सांगता ना. गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. सिव्हिल लाईन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित डॉ. सी. डी. मायी यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘विद्यापीठात कुलगुरूंचे महत्त्व आहे. पण इतर घटकांमध्ये समन्वय, संवाद आणि सहकार्य खूप आवश्यक आहे. आपल्या उद्दिष्ट्यांसाठी हे सामंजस्य कसे निर्माण करता येईल, याचा विचार करावा लागेल. तरच दिशादर्शक काम होईल. विविध गुणांचे लोक एका ठिकाणी काम करीत असतात. प्रत्येकाच्या गुणाचा उपयोग करून सक्सेस स्टोरी बनविणे, ही नेतृत्वाची कसोटी असते.’
विद्यापीठाची लोकाभिमुखता अत्यंत महत्त्वाची आहे. विकासाच्या मार्गदर्शनात योगदान देण्याचा विद्यापीठाने विचार करावा. त्याचे सामाजिक स्वरुप चांगले असेल आणि लोकांचे समर्थनही विद्यापीठाला मिळेल, असेही ते म्हणाले.
डॉ. माशेलकर यांच्या विचारांचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. भविष्यात चांगले काम करण्याचा विचार आपण करू शकतो. भविष्यातील दृष्टीकोन ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे, असेही ना. गडकरी म्हणाले. एखादी व्यक्ती ओनरशीप घेते तेव्हा मोठमोठ्या संस्था यशस्वी होतात. त्यानंतरच त्याचे सामूहिक श्रेय सर्वांना मिळत असते. त्यामुळे आपल्याला ओनरशीप घेऊन काम करावे लागेल, असे ना. गडकरी म्हणाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानुरुप विद्यापीठाची कृती असली पाहिजे. कारण समाजोपयोगी विचार राष्ट्रसंतांनी अत्यंत सोप्या शब्दांत मांडले आहे, याचाही ना. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. विद्यापीठाला आता शंभर वर्षे झाली आहेत. त्यामुळे आता पुढील पन्नास वर्षांसाठी प्रत्येक विभागाने नियोजन केेले पाहिजे, असेही ते म्हणाले.