- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : श्रद्धेय दत्‍ताजी डिडोळकर जन्‍मशताब्‍दी वर्षाचा थाटात समारोप

नागपूर समाचार :- श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोपीय सोहळा आज (बुधवार) रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात थाटात पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे पिठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते.

अभाविप अखिल भारतीय संघटन मंत्री आशिष चव्‍हाण, आधारवडचे लेखक अरुण करमरकर, समितीचे सचिव माजी खासदार अजय संचेती, संयोजक भुपेंद्र शहाणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ च्‍या दुस-या आवृत्‍तीचे पुस्तकाचे प्रकाशन करण्‍यात आले. अजय भालेराव यांनी अनुवादित केलेल्‍या ह‍िंदी आवृत्‍ती ‘द‍िपस्‍तंभ’ चे तसेच, स्‍मरणिकेचे प्रकाशन करण्‍यात आले.

‘दत्‍ताजी डिडोळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवत कार्यकर्त्‍यांची फौज निर्माण केली. आपल्‍या दृढ संकल्‍पाने त्‍यांनी कार्यकर्त्‍यांमध्ये विश्‍वास निर्माण केला. आज दशा बदलली, समाजाची स्थिती बदलली पण त्‍यांनी दाखवलेली दिशा बदललेली नाही. त्‍यामुळे आता त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्‍याचा संकल्‍प आपण केला पाहिजे,’ असे प्रतिपादन डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. ज‍ितेंद्रनाथ महाराज म्हणाले, ‘राष्‍ट्रनिर्माण आणि व्‍यक्‍तीनिर्माणासाठी दत्ताजी डिडोळकर यांनी तन-मन-धनाने कार्य केले. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.’

दत्‍ताजी डिडोळकर यांनी कार्यकर्त्‍यांवर निस्सिम प्रेम केले. त्‍यांनी गुणदोषांसकट कार्यकर्त्‍यांचा स्‍वीकार केला. त्‍यांनी आपल्‍या जीवनदृष्‍टीने कार्यकर्तांवर संस्‍कार करून व्‍यक्‍तीनिर्माणाचे काम केले. ते कार्यकर्त्‍यांचा आधार होते, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘दत्‍ताजी केवळ समर्पित, कर्मठ कार्यकर्ता नव्‍हते तर अजातशत्रू होते. विरोधकही त्‍यांचा सन्‍मान करायचे. ते उदारमतवादी होते, असामान्‍य गुणवत्तेचे धनी होते. ते आयुष्‍यभर स्‍वयंसेवक राहिले.’ ‘आधारवड’ हे पुस्‍तक नव्‍या पिढीला प्रेरणा देत राहील असेही ते म्हणाले.

शिक्षण व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या संभाजीनगर येथील ओंकार विद्यालयाला श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर शिक्षण पुरस्कार प्रदान करण्‍यात आला. संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. संजीव सावजी यांना 1 लाख रुपयाचा धनादेश डॉ. मोहनजी भागवत यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. अमर कुळकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. सूत्रसंचालन श्‍वेता शेलगावकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *