!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
!!!परमात्मा एक!!!
परमात्मा एक : बाबांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट, नियम त्यांना आलेल्या अनुभवातून आणि भगवंतानी त्यांना वेळोवेळी दिलेल्या प्रचिती व मार्गदर्शनातुन दिलेले आहेत.
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करुन ही परमेश्वरी कृपा निष्काम व निस्वार्थ भावनेने दुःखी लोकांना फुकटात वाटुन, लाखो लोकांचे दुःख दुर केले.हानत्यागी बाबा जूमदेवजींच्या घरी खूप दुःख होते आणि अशी बिकट अवस्था होती की, प्रत्येक वेळेस घरच्या कर्त्या व्यक्तीचा देहांत व्हायचा. असे होत होत त्यांचे वडील, काका यांचा देहांत झालेला आणि नंतर फक्त ४ भाऊ उरलेले होते. अश्या बिकट परिस्तिथीत बाबा एका मांत्रिकाकडे जाणार असताना कधी घरी न येणारा एक साधा व्यक्ती घरी आला आणि म्हणाला की, मला एक परमेश्वरी शक्तीला प्राप्त करण्याचा विधी माहिती आहे आणि त्या विधीने दुसऱ्यांचे पण दुःख दूर होतात. तो व्यक्ती मौदा या गावचा होता आणि त्या व्यक्तीने ती विधी कधीही करण्याचे धाडस दाखविले नव्हते. त्या साध्या व्यक्तीस बाबांनी विचारले की, तुम्ही तर संन्यासी दिसत नाही आहात, मग तुमच्याकडे हि विधी कशी?
तर तो व्यक्ती म्हणाला की, माझे वडील एका संन्यास्या सोबत राहायचे, तर हा विधी त्यांचा आहे आणि तो संन्यासी मरण पावल्यामुळे माझ्या वडिलांनी त्या संन्यासाचे सर्व ग्रंथ घरी आणले आणि माझे वडील काही लोकांना तीर्थ करून देत असे परंतु, त्यांनी यामध्ये स्वतःचे डोळे गमावले आणि आंधळे झालेत. म्हणून मी पण हा विधी कधीही करण्याचे धाडस केले नाही.
त्या साध्या व्यक्तीने बाबांना एक कल्पना दिली कि, ज्या व्यक्तीने हा विधी केलेला आहे तो असफल झाल्यामुळे एक तर मरण पावला किंवा वेडा झाला आहे.
हे ऐकून बाबांनी हि समस्या सर्व भावंडापुढे ठेवली. परंतु जीवाची भीती असल्यामुळे कुणीही तयार झाले नाही. म्हणून बाबा जुमदेवजींनी निर्णय घेतला की, मी हा विधी करणार आणि मला काही झाले तर तुम्ही माझ्या कुटुंबाचा सांभाळ करावा.
विधिच्या २१ व्या दिवशी बाबांचे थोरले बंधू नारायणराव बाबांकडे आले व सांगू लागले की, माझ्या मुलीची प्रकृति खुप खराब आहे. माझ्यासोबत घरी चल आणि तिला त्रासातुन मुक्त कर. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले की, मला यातले काहीच कळत नाही. मी फक्त पहाटेस उठून हनुमानजीला कपूर लावून मंत्र म्हणतो व प्रदक्षिणा घालतो. तेव्हा त्यांच्या बंधुनी बाबाला घरी येण्याची आणि मुलीला बघण्याची विनवनी केली. तेव्हा बाबांनी त्यांच्या शब्दाला मान दिला व त्यांच्या घरी गेले.
बाबांना त्या मुलीला पाहून खुप दुःख झाले. तिच्या संपूर्ण अंगावर खुप मोठेमोठे फोड़े आले होते. ते फुटून पूर्ण शरीरावर रक्त वाहत होते. त्या मुलीचा अंग पूर्ण लाल मुंग्यानी व्यापला होता. हे पाहून बाबा खुप घाबरले व विचारमग्न झाले. त्यांच्या मनात आले की, बाबा हनुमानजी ला प्रसन्न करण्याकरीता विधि करने खुप कठिन आहे अशी जी समजूत आहे, ती खरी असावी, आता मात्र परमेश्वर आपल्याला ही विधि पुर्ण करू देणार नाही.
परंतु विधि तर पुर्ण करायची आहे, नाहीतर काय दुःख येईल हे सांगता येत नाही. “एकीकडे खाई” व “दूसरी कडे विहीर” अशी अवस्था बाबांची झाली होती, पण बाबांचा निर्धार पक्का होता. ते डगमगले नाही. तेथे बाबा काहिही न बोलता कोणतेही उपचार न करता घरी परत आले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे विधिच्या बाविसाव्या दिवशी ठरलेल्या वेळेप्रमाणे देवळात गेले, तिथे त्यांनी बाबा हनुमानजींची आंघोळ घालून कापुर, अगरबत्ती लावली व विनंती केली की, हे भगवान बाबा हनुमानजी, तुम्ही माझ्यावर खुप मोठी आपत्ति आणून ठेवली आहे, मी आपणास विनंती करतो की, मला आपल्या चरणी विलीन करा, अन्यथा त्या मुलीला मुक्त करा.
त्यानंतर बाबा एकविस प्रदक्षिणा घालून घरी आले. त्या दिवशी बाबांच्या मनात दुसरा कुठलाच विचार आला नाही. तो दिवस तसाच गेला.
तेविसाव्या दिवशी बाबा पहाटेस विधि आटोपुन घरी येवून सकाळीच बाहेरच्या खोलीत दाराजवळ बसले होते, ज्या मुलीला त्रास होता ती मुलगी तिच्या घराच्या अंगनात खेळत होती. बाबांचे लक्ष त्या मुलीकडे गेले. तिला पाहुन बाबांना आश्चर्य वाटले. त्या मुलीचे सर्व फोड बसले होते. हे पाहुन बाबांना समाधान वाटले.
या प्रमाणे परमेश्वराने बाबांची पहिली परीक्षा घेतली आणि बाबांचे परमेश्वरा विषयी असलेले अतोनात प्रेम आणि श्रद्धा पाहुन त्यांच्या विनंतीला परमेश्वराने प्रतिसाद दिला. बाबांना पहिली सफलता प्राप्त होवून परमेश्वरी कृपा संपादन करण्याचे बाबांचे प्रयत्न साकार झाले. अशा प्रकारे बाबांनी ४१ दिवसांचा विधी पुर्ण केला व ४२व्या दिवशी साखरेचा नैवेद्य केला. तो दिवस ६ जानेवारी १९४६ रोज रविवार असुन बाजाराचा दिवस होता. या वेळेस बाबा जेमतेम २५ वर्षाचे होते.
परमेश्वराबद्दल बाबांमध्ये खुप आत्मीयता आणि जिद्द आहे, हे गुण यावरुन लक्षात येते
विधी समाप्त केल्यानंतर बाबा मौद्याला गेले व ज्या व्यक्तीकडे बाबांना दिलेला मंत्र लिहून होता, त्याने बाबांचे पाहुणे या नात्याने आदरातिथ्य केले. थोडा वेळ बसल्यानंतर त्याला बाबा म्हणाले की, काल विधी समाप्ती झाली. सर्व विधी सुरळीत पार पडली. असे सांगून पुढील कार्य सांगण्यास विनंती केली.
पुढच्या कार्याबद्दल सांगताना ती व्यक्ती बाबांना म्हणाली की, रोज एकवेळा या प्रमाणे ७, ११, २१, ३१, ५१, ६१, ७१, ८१, ९१ आणि १०१ दिवस त्याच मंत्राने १०८ वेळा मंत्र म्हणुन तितक्याच वेळा हवनात तुप आणि आहुती टाकावी लागते. परंतु जो संन्यासी मरण पावला, ज्याचा हा मंत्र होता, तो त्रीताल (एका रात्रीतून तिन वेळा ) हवन करत होता.
त्याचा विधी असा की, संध्याकाळी सुर्यास्तानंतर सुरु करुन रात्रभरात तिन्ही हवन सुर्योदयापर्यंत संपले पाहिजे. जागा साफ करणे, आंघोळ करणे, हवनाची रचना करून १०८ वेळा मंत्रोच्चाराने आहुती सोडणे. पहिले हवन संपले की दुसरे सुरू करण्यापूर्वी तिच जागा स्वच्छ करून व आंघोळ करून त्याच जागेवर परत हवनाची रचना करावी. पुन्हा प्रसाद करावा आणि हवनाचा विधी पूर्ण करावा. तो संपला की तिसरे हवन त्याच जागेवर ती जागा स्वच्छ करून व आंघोळ करून पुन्हा प्रसाद करावा व हवन पूर्ण करावे. अशा प्रकारे तीन हवन एकाच रात्रीत पूर्ण करावे. हे त्रिताल हवन ७, ११, २१ ते १०१ दिवस करावे लागते. हवनाकरीता लागणारे साहित्य म्हणजे रानगोवऱ्या, पिंपळ, वड, संत्रा, मोसंबी, आंबा, उंबर इत्यादी झाडांपैकी पाच झाडांच्या काड्या, नारळ, फळे, पान, सुपारी, हार, बेलफूल, आहुतीत सोडायला तूप (ऐपतीप्रमाणे साजूक किंवा वनस्पती), दही, दूध, फक्त बाबा हनुमानजीची प्रतिमा असलेला फोटो, गोमूत्र, चंदनचुरा, हवनपुडा, अबीर, सेंदुर, गुलाल, पान, सुपारी इत्यादी सामान लागते आणि प्रसाद म्हणून कढई (हलवा) करावी लागते.
हे सर्व लिहून घेऊन बाबा सायंकाळी नागपूरला परत आले. तेव्हा घरातील सर्वजण त्यांची वाट पाहतच होते. घरी आल्यावर त्यांनी वरील सर्व माहिती सर्वांना सांगितली आणि म्हणाले ही खर्चाची बाब आहे. अगोदरच आपली आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे. म्हणून आपण दिवसभर विणकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची खरेदी करून रात्री त्रिताल हवन करू. याशिवाय त्रिताल हवन असल्यामुळे रात्रभर जागरण होईल. म्हणून सर्वांनी जागायची आवश्यकता नाही. कारण सर्वांचे जागरण झाल्यास दुसऱ्या दिवशी विणकाम होणार नाही. त्यामुळे मजूरी मिळणार नाही आणि सामान न आल्यामुळे हवनकार्य करता येणार नाही आणि हवनात खंड पडेल. यावर सर्वांनी गंभीरतापूर्वक विचार केला आणि दुसऱ्या दिवसापासून सात दिवस त्रिताल हवन करायचे ठरविले.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्वांनी विणकरी करून संध्याकाळी मजूरी मिळाल्यावर सामानाची जुळवाजुळव मोठ्या मुश्किलीने केली आणि संध्याकाळी सात वाजता पहिल्या हवनाला सुरुवात केली. या मार्गातील सेवक ज्याप्रमाणे हवनाची मांडणी करतात त्याच प्रमाणे त्याची मांडणी केली आणि सांगितल्याप्रमाणे हवनकार्याला सुरुवात केली. पहिले हवन संपले की दुसरे, तिसरे हवन करीत पुर्ण सात दिवस त्रिताल हवन केले. पहिले हवन संपल्यानंतर जेवण करीत. नंतर दुसरे हवन रात्री अकरा वाजता सुरू करीत. तिसरे हवन रात्री तीन वाजता सुरू करून पहाटे पाच वाजता संपत असे. परत दुसऱ्या दिवशी दिवसभर विणकाम करून सायंकाळी सामानाची जुळवाजुळव करीत. यावेळेस खूप त्रास होत होता. बाबा स्वतः हवन करीत होते. त्याशिवाय स्वतःच हवनात आहुती सोडायचे. दुसऱ्या कोणालाही हवनात आहुती टाकायची परवानगी नव्हती. हवन करताना बाबा कोणाशीही बोलत नसत. एखादी वस्तू लागली तर इशाऱ्याने सांगायचे. जर काही विचारायचे असेल तर, पाटीवर पेन्सिलीने लिहून किंवा कागदावर पेनाने लिहून विचारत असत. याप्रमाणे बाबांनी सतत सात दिवस त्रिताल हवन केले.
बाबांचे देहभान हरपले व बाबा निराकार स्तिथीत घरच्या कुटुंबियांना म्हणाले की, सेवक भगवान बन गया है। क्योकी भगवान का सीर और सेवक का धड, और सेवक का सीर और भगवान का धड एक हो चुका है, सेवक भगवान में मिलिन हो चुका है । कृपया किसीभी बाई कि परछाई सेवक (बाबा) पे ना पडणे दे नही तो सेवक भस्म हो जायेगा। कहीका नहीं रहेगा।
अशारितीने बाबा निराकार अवस्थेत असल्यामुळे घरच्यांनी भगवंतास विनंती केली, तर भगवंत बाबांच्या मुखातून म्हणाले की, एवढी काळजी होती तर कशाला माझी प्राप्ती केली. तर सर्व कुटुंबीयांनी विनंती करून कार्य केल्यामुळे बाबा निराकार अवस्थेतून बाहेर आले.
त्या साध्या व्यक्तीच्या वडिलांजवळ तो विधी होता, जे आंधळे झालेले आणि त्यांच्या वडिलांचा मित्र जो संन्यासी होता, त्याच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीला माहिती असून पण त्यात ती विधी करण्याचे धाडस नव्हते. म्हणून त्याने बाबा जुमदेवजीला फक्त हि विधी दिली. परंतु, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीमध्ये हे धाडस नव्हते, की ही विधी करावी आणि ते धाडस फक्त आणि फक्त बाबा जुमदेवजींनी दाखवले आणि ती विधी पूर्ण करून भगवंताला म्हणजेच निराकार शक्तीस प्राप्त केले आणि भगवंताने त्याच्या गुणांची ओळख बाबांना करून दिली आणि पूर्ण आकाशात एकच डोळा दाखवला.
बाबांनी बाबा हनुमानजीची प्राप्ती व एका भगवंताची प्राप्ती कशी केली
लहान पणापासून बाबा जुमदेवजी हनुमानजीची पूजा करत होते आणि ही विधी करताना त्यांनी हनुमानजीला समोर ठेवून केली. परंतु ज्या वेळेस शांताबाईच्या अंगातील भूत निघत नव्हते, तेव्हा बाबांनी प्रश्न केला की, “ऐसी कोणसी शक्ती है, जो शैतानको एक पलमें निकाल सके, शैतान किसे कहे और भगवान किसे कहे, इसका स्पष्टीकरण हमे समझा दो” त्या वेळेस बाबांना त्या निराकार चैतन्य शक्तीने म्हटले की.
“यह एकही परमेश्वर है, जीसने इस सृष्टीका निर्माण किया है। वह एक जागृत शक्ति है, जो निराकार है। वह चोबीस घंटे चैतन्य है, उसे प्राप्त करनेके लिए पांच दिन हवन करना पड़ेंगा।” त्यांनतर थोड्या वेळाने बाबा त्या निराकार अवस्थेतच घराच्या मंडळींना उद्देशून म्हणाले की, “परिवार के लोग सुनो, हम कलसे पांच दिन हवन करेंगे।”
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून बाबांनी पाच हवनांना रोज एक याप्रमाणे सायंकाळी सुरुवात केली. हा दिवस श्रावण वद्य प्रतिपदा व तो वार शुक्रवार होता. त्या दिवसाची तारीख २० ऑगस्ट १९४८ होती. पाचव्या दिवशी हवन संपताक्षणीच बाबांचे ब्रह्मांड चढले. ते देहभान विसरले आणि निराकार अवस्थेत आले. त्या अवस्थेत ते खूप आकांत करून रडू लागले. तेव्हा घरातील सर्व मंडळी हजर होती. त्या निराकार अवस्थेत बाबांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की, “मैं कहा आ गया हूँ!” असे म्हणून पुन्हा जोरजोरात आकांत करून रडू लागले. घराच्या मंडळींना उद्देशून म्हणाले, “घरवालो सुनो, मैं कहा आ गया हूँ। सेवक भगवान बन गया।”
हे ऐकून बाबांच्या कुटुंबातील सर्व घाबरले व त्यांना “बाबा चूप हो जाओ” असे विणवु लागले. परंतु बाबा निराकार अवस्थेत असल्यामुळे त्यांना काहीच कळत नव्हते. “मैं कहा आ गया हुं” असे म्हणत बाबा सारखे एक ते दीड तासपर्यंत आकांत करून रडत होते. त्यांनतर शांत झाले व निराकार अवस्थेतून ते देहभान अवस्थेत आले. त्यांनतर त्यांनी जेवण केले आणि आराम केला परंतु ते जणू गुंगीतच होते.
दुसऱ्या दिवशी श्रावण वद्य षष्टी होती. त्या दिवशी १९४८ सालच्या ऑगस्ट महिन्याची २५ तारीख असून बुधवार होता, या दिवशी बाबा गुंगीतच असल्यामुळे हवणाची समाप्ती म्हणून घरच्या लोकांनी हवन केले. हवन झाल्यावर पुन्हा बाबांचे अंग फिरू लागले व ते देहभान विसरले आणि त्यांचे ब्रह्मांड चढले. ते निराकार स्थितीत आले व काही वेळाने त्यांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की, देशात जितकी दैवते आहेत ती सर्व बाबांना एकामागून एक दर्शन देऊन जात आहेत व आपला परिचय देत आहेत. ही क्रिया खूप वेळ चालली.
ही संपूर्ण क्रिया झाल्यावर त्यांच्या अंगात शेवटी एक भगवान आलेत त्यांनी आपला परिचय दिला. या वेळेस बाबांच्या मुखकमलातून असे उद्गार निघाले की, “मैं सबका एकही भगवान हूँ। सेवक, तु मुझे कहा ढूंढ रहा है। मैं चौबीस घंटे तेरे पास हूँ। जो क्षण मैं तुझसे छूट जाऊंगा, तेरा शरीर मृत हो जाएगा।”
तेव्हा बाबांना वाटले की, “मैं कितना पागल हुं” भगवान मेरे पास होकर मैं ऊसे कितना दूर तलाश रहा हुं।”
तेव्हा बाबांना प्रचिती मिळाली कि, या जगाचा एकच भगवंत आहे, जो निराकार आहे, चैतन्य आहे आणि तो कुठल्याही मूर्तीत विराजमान नाही.
परंतु बाबा अजूनही मंदिरात जायचे व बाबा निराकार अवस्थेत असल्याने बाबांच्या मुखकमलातून त्या निराकार शक्तीने म्हटले की, “हे मानव भलेही तुने मुझे प्राप्त किया हो, लेकिन मैं मानव पे कदापि विश्वास नाही करता। क्योंकी, मानव यह बेईमान हैं।”
यावर बाबांनी त्या निराकार शक्तीला दोन वचन दिले
१) परमात्मा एक
२) मरे या जीये भगवत नामपर
तेव्हा त्या निराकार शक्तीने दोन वचन बाबांना दिले
३) दुःखदारी दूर करते हुये उद्धार
४) इच्छा अनुसार भोजन
थोडा वेळ शांत राहून बाबा कुटुंबातील व्यक्तींना उद्देशून म्हणाले की, “परिवार के लोग सुनो, इस परिवार के लोग सारी पूजा बंद करके एकही भगवान को मानेंगे।”
त्यांनतर बाबांची निराकार अवस्था संपली व ते देहभानात आले
म्हणून मूर्तिपूजा बंद करण्यात आली व देवळात जाणे बंद करण्यात आले आणि एकाच भगवंताची पूजा करायला सुरुवात झाली. म्हणून आपण षष्टीचे हवन बाबांच्या आदेशाप्रमाणे राखीनंतर ६ व्या दिवशी प्रत्येक वर्षी प्रगट दिन म्हणून साजरा करीत असतो.
ज्याप्रमाणे अनेकातील लोक दिवाळी हा सर्वात मोठा सण माणुन खुप उत्साहाने साजरा करतात, त्याचप्रमाणे आपल्यासाठी षष्ठी चे हवनकार्य हा सर्वात मोठा सण आहे व दिवाळी या सणाचे आपल्यासाठी काहीच महत्त्व नाही.
या दिवशी प्रत्येक त्याग झालेल्या कुटुंबात षष्ठी चे हवनकार्य कुटुंब प्रमुखांनी घडवायलाच पाहिजे. यात कसलिही सुट नाही आणि म्हणून सेवक नोकरी किंवा शिक्षणानिमित्त जरी बाहेर राहत असतील, तरी षष्ठी च्या हवनाला घरी येऊन एकतेने हा सण साजरा करत असतात.
काही त्याग झालेल्या कुटुंबात षष्ठी च्या हवनकार्याच्या अगोदर साधे कार्य करून हवनाच्या दिवशी त्या कार्याची समाप्ती करत असतात. परंतु, माझ्या मते तरी हे चुकीचे आहे. कारण, असे केल्यास ते हवनकार्य साध्या कार्यानिमित्त घडविले असा त्याचा अर्थ होतो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बाबांनी आपल्याला भगवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त प्रत्येक वर्षी त्यागी कुटुंबात हवन घडविण्यास आदेश दिलेला आहे, परंतु षष्ठीस अनुसरून आधी साधे कार्य कधीच करण्यास आदेश दिलेला नाही. त्यामुळे बाबांनी आपल्याला जे सांगितले आहे, तेच करणे हे आपले कर्तव्य आहे. जर, साधे कार्य करून हवन घडवायचे असते तर, बाबांनी याबद्दल नक्कीच सांगितले असते. म्हणून नवीन नियम तयार न करता, बाबांनी सांगितल्याप्रमाणेच आपण कार्य करायला हवे.
तसेच, काही सेवक या दिवशी अनेकांना जेवणाचे आमंत्रण देतात. तर, यात एक दक्षता घ्यायला हवी की, व्यसनी नातेवाईकांना जेवण सांगताना अगोदरच त्यांना सांगावे की, व्यसन करून येऊ नये व शब्दांची सोडवून करावी. हवनापेक्षा व मार्गाच्या शिकवणूक पेक्षा व्यसनी लोकांना महत्त्व देउ नये व दुःखाचे भागीदार होउ नये. आपल्यासाठी हवनकार्य महत्त्वाचे आहे, जेवण सांगणे महत्त्वाचे नाही आणि हवनकार्यात व हवनकार्याच्या विधी मध्ये अनेकवाल्यांना कोणताही हस्तक्षेप व कोणतेही सहभाग घेऊ देऊ नये. ते फक्त उपस्थित राहून, हवनकार्याचा लाभ घेऊ शकतात.
अशाप्रकारे “एका भगवंताचा प्रकट दिन” म्हणून आपण त्याग झालेले सेवक एकाच दिवशी सर्व कुटंबात एका भगवंताचे हवनकार्य एकतेने करून साजरा करत असतो व साधे सेवक सुद्धा या हवनकार्यांचा लाभ घेऊन हा दिवस साजरा करत असतात.
आपण हिंदू धर्मात असल्यामुळे, एका भगवंताचे प्रतीक म्हणून बाबा जुमदेवजींनी बाबा हनुमानाजीला गुरु मानले होते, म्हणून बाबा जुमदेवजींचे गुरु बाबा हनुमानजी आहे व आपण बाबा जुमदेवजीला आपले गुरू मानतो.
सतत परमेश्वरी कृपेचा प्रसार व प्रचार बाबांनी खालील प्रमाणे केला
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी स्वतःच्या घराचे सर्व दुःख वरील प्रमाणे एका भगवंतास प्राप्त करून दूर केले आणि सुख समाधानी मिळविली. परंतु बाबांना विचार आला की, एवढी मोठी विलक्षण आणि जागृत शक्ती जर आहे, तर का नाही आपण अनेकांना याचा फायदा करून द्यावा आणि महानत्यागी बाबा जुमदेवजींनी अनेक परिवारांना त्यांच्या दुःखातून दूर करण्याकरिता आपली पुढली वाटचाल चालू केली. परमेश्वरास दिलेल्या वचनास घेऊन निष्काम तसेच निस्वार्थपणे अनेकांना या मार्गाला जोडण्याकरिता सुरुवात केली आणि अनेकांचे दुःख दूर करण्यास मदत केली. अनेकांना मार्गदर्शन केले, सेवक संमेलन घेतले, चर्चा बैठक घेण्यास आदेश दिला आणि ४ तत्व, ३ शब्द व ५ नियमांना अंगिकारून जगायला शिकविले. बाबांनी “परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर” ची स्थापना करून एका नव्या युगाची सुरुवात करून “मानव धर्म” तयार केला आणि जसे जसे अनेक सेवक जुळत गेले, तसे तसे अनेक शाखा स्थापन केल्या, ज्या नागपूर मंडळांतर्गत कार्यरत ठेवल्या.
अनेक बँक, दूध डेअरी, ग्राहक भंडार संस्था, धर्मार्थ दवाखाना अश्या अनेक संस्था सेवकांकरिता उभारल्या आणि आयुष्यभर फक्त अनेकांना भगवत गुणांचे निष्काम आणि निस्वार्थपणे खेडोपाडी जाऊन कार्य करून जगवण्याचेच कार्य केले.
लिहीण्यात काही चुकी झाली असेल तर क्षमा कराल