14 ऑगस्टपर्यंत होणार रानभाजी महोत्सव
नागपूर समाचार : औषधी गुणधर्माने परिपूर्ण असलेल्या अनेक रानभाज्यापासून महानगरातील पिढी दुरावत चाललेली आहे. त्यांना या रानभाज्या उपलब्ध व्हाव्यात व भाजी उत्पादक शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचता यावे यादृष्टीने हा महोत्सव महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक 12 ते 14 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्राहक व शेतकरी गटांसमवेत त्यांनी संवाद साधला. आत्माच्या प्रकल्प संचालिका डॉ. अर्चना कडू, उप संचालिका पल्लवी तलमले, स्मार्ट नागपूरचे नोडल अधिकारी अरविंद उपरीकर यांची यावेळी उपस्थिती होती.
रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून गुळवेल, मटारु, काटेमोड, आघाडा, केना, अंबाडी आदी रानभाज्या उपलब्ध झाल्या आहेत. या स्टॉलला नागरिकांनी भेट देऊन औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची खरेदी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. या महोत्सवाला एक दिवसाची वाढ देण्यात आली असून हा महोत्सव 14 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.
तालुका कृषी अधिकारी मनीषा थेरे, दिपाली कुंभार, योगेश राऊत आदि अधिकारी तसेच आत्मा यंत्रणा व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करीत आहेत.