नागपूर समाचार : केंद्र सरकारच्या वतीने यावर्षी ‘घरोघरी तिरंगा’ हे देशव्यापी अभियान राबविण्यात येत आहे. देशाभिमान वाढविणाऱ्या या अभियानात मोठ्या संख्येत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिका, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर आणि महा मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने सीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ आणि स्वातंत्र्य चळवळीतील प्रसंगांवर आधारित मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आज मंगळवार १३ ऑगस्ट रोजी या छायाचित्र प्रदर्शनाचे नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
याप्रसंगी पत्र सूचना कार्यालयाचे उप निदेशक शशिन राय, महामेट्रोचे महाव्यवस्थापक सुधाकर उराडे, मनपा शिक्षणाधिकारी साधना सयाम, केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सौरभ खेकडे, मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी उपस्थित होते.
देशात स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये हे साहस होते त्याची प्रचिती मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनामध्ये दिसून येत असल्याचे प्रतिपादन यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. त्यांनी या प्रदर्शनासाठी केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूरने पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी विभागाचे अभिनंदन देखील केले.
देशाच्या फाळणीच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष देणारे छायाचित्र देखील या प्रदर्शनामध्ये लावण्यात आलेले आहे. ‘हर घर तिरंगा’, स्वातंत्र्य दिन, विभाजन विभीषिका, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयांवर आधारित प्रदर्शन असून यामध्ये दुर्मिळ छायाचित्रांमधून प्रेरणादायी माहिती मिळत आहे. १३ ते १५ ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन विद्यार्थी आणि नागरिकांसाठी नि:शुल्क उपलब्ध असेल. प्रदर्शनाला जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूर तर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सौरभ खेकडे यांनी केले. त्यांनी उपस्थितांना ‘तिरंगा शपथ’ दिली. कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले तर आभार पत्र सूचना कार्यालयाचे उप निदेशक शशिन राय यांनी मानले.