भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची माहिती
मुंबई समाचार : महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने घोषित केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा 3 हजार रुपयांचा पहिला हप्ता लाडक्य़ा बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेबद्दल माताभगीनींच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी 18 ऑगस्ट रोजी राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाने या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेत हा ‘लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’ कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रितू तावडे, महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल पेंडसे, त्रिशला हंचाटे आदी उपस्थित होते.
यावेळी वाघ यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व येथील महापालिकेच्या मैदानामध्ये 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता होणा-या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला 10 हजार महिला उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून प्रत्येक जिल्ह्यातील दोन बहीणी फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहेत.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महायुती सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ केवळ घोषित केली नाही तर भरीव निधीची तरतूद करून योजना अंमलात आणली आहे. लाडकी बहीण योजना असो वा समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी महायुती सरकारने आणलेल्या योजना असोत, त्यांच्या यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे.
म्हणूनच या ना त्या प्रकारे या योजनांमध्ये खोडा घालण्याचा हीन प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करत आहेत अशा शब्दांत वाघ यांनी मविआच्या नेत्यांचा समाचार घेतला. बारामतीच्या मोठ्या ताईंना दीड हजाराचे मोल कळणार नाही मात्र या योजनेमुळे राज्यातील माताभगीनी खूष असून त्या महायुती सरकारला आशीर्वाद देत असल्याचेही वाघ यांनी सांगितले.