देशपांडे सभागृहातील जनसंपर्काला नागरिकांची गर्दी
नागपूर समाचार : गुंठेवारी, मालकीपट्टे, अतिक्रमण आदी विषयांशी संबंधित नागरिकांच्या समस्या कायद्याच्या अधिन राहून ठरावीक वेळेत निकाली काढा, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
ना. श्री. नितीन गडकरींचा जनसंपर्क कार्यक्रम रविवारी सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी ना. श्री. गडकरींनी फक्त नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाशी (एनएमआरडीए) संबंधित तक्रारी स्वीकारल्या.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, नासुप्रचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची उपस्थिती होती. जनसंपर्क कार्यक्रमाला नागपूर व शहरालगत विकसित झालेल्या भागातील नागरीक मोठ्या संख्येने आले होते. यावेळी आरएल, मालकीहक्काचे पट्टे, गुंठेवारी, अनधिकृत ले-आऊट, अतिक्रमण, अविकसित भागातील रस्ते व नाल्यांचे प्रश्न आदींसंदर्भात नागरिकांनी तक्रारींची निवेदने ना. श्री. गडकरी यांना दिली.
ना. श्री. गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
– नागरिकांच्या समस्यांवर नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. हे करताना खर्चाच्या बाबी लक्षात घ्याव्यात. त्यात अडचणी असतील तर माझ्याशी चर्चा करा; आपण त्यातून मार्ग काढू
– एनएमआरडीए व एनआयटीची सांडपाण्याची लाईन व मनपाद्वारे होत असलेला नागनदी प्रकल्प यांचा समन्वय ठेवावा.
– शहरातील वस्त्यांमध्ये कमी खर्चाचे छोटे रस्ते बांधण्याच्या संदर्भात विचार करावा.
– व्हाईट टॉपिंगचा वापर करून जुन्या रस्त्यांच्या डागडुजीची शक्यता पडताळून पाहावी.
– नागपुरातील अधिकृत व अनधिकृत ले-आऊट्समधील परिस्थितीचा अहवाल सादर करावा.
– जनसंपर्कात प्राप्त तक्रारींच्या सद्यस्थितीचा अहवाल पंधरा दिवसांच्या आत सादर करावा.