नागपूर समाचार : आजपर्यंत आलेल्या वाईट अनुभवातून प्रत्येक वेळेस तेली समाजाला जाणून बुजून डावलले जाते. गृहित धरले जात आहे. मागील लोकसभेत सुद्धा राज्यात पोटजातींसह ११% तेली समाज असूनही फक्त आमचे राज्य अध्यक्षांना एकच उमेदवारी देण्यात आली त्यातही मराठा-कुणबी-ओबीसी असा भेद निर्माण करून ती “सीट” जाणून-बुजून पाडण्यात आली व समाज संघटना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही हे होऊ देणार नाही. अशा गलिच्छ राजकारणामुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रस्थापित पक्ष तेली समाजाला गृहीत धरून फक्त मतदानासाठी उपयोग करून घेतो अशी भावना प्रत्येक तेली समाजाच्या बांधवांमध्ये निमार्ण झालेली आहे.
याबाबत संघटनेने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून प्रत्येक प्रांतिकच्या शाखा,प्रस्थापित संस्था-मंडळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले की, त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा तेली समाजाला जाणूनबूजून डावलले जात आहे. याची खंत प्रत्येकाने व्यक्त केली म्हणून उद्या रविवार दिनांक १८ ऑगस्ट २४ रोजी नागपूर येथे होणाऱ्या संघटनेच्या राज्यस्तरीय कार्यकारणी सभेमध्ये “जो पक्ष १०% तेली समाजाला उमेदवारीच्या निमित्ताने प्रतिनिधित्व देईल त्याच पक्षाच्या बाबत किंवा त्याच पक्षाला सहकार्य करण्याची भूमिका ही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा घेईल” असे प्रस्तावित ठरावाबाबत ठाम प्रतिपादन अध्यश श्री रामदास तडस माजी खासदार व डॉ. भूषण कर्डिले यांनी केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही तेली समाजाची एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय संघटना असून या संघटनेची कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्नता नाही. परंतु हल्लीचे सामाजिक तथा राजकिय वातावरण पहाता समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी समाजकारणा मधून राजकारणाकडे वाटचाल करणे क्रमप्राप्त असल्याने यापुढे संघटनेचे धोरण बदलणे अत्यावश्यक वाटत आहे.या राज्य संघटनेची राज्य कार्यकारिणीची सभा दि .18/08/2024 ला आमदार निवास नागपूर येथे घेण्यात आली. सभेला प्रामुख्याने श्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रंताध्यक्ष, महासचिव डॉ.भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष श्री गजानन शेलार, सहसचिव बळवंत मोरघडे, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे आधी प्रामुख्याने हजर होते. सभेचे संचालन सभेचे आयोजक श्री बळवंत मोरघडे,राज्य सहसचिव यांनी केले.तर आभार विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य यांनी म्हणाले.
या सभेमध्ये “जो पक्ष किंवा जे जे पक्ष पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा, महामंडळ आदी निवडणुकीत समाजाला १०% प्रतिनिधित्व/उमेदवारी देतील त्यांनाच सहकार्य करावे असा प्रस्तावच एकमताने मंजूर करण्यात येईल.”
संपूर्ण राज्यात विधानसभेसाठी तेली समाजासाठी जवळपास 20 ते 22 उमेदवारी विविध पक्षाकडे मागणी केली जाईल. ज्या भागात व ज्या पक्षात समाजाचे जे सक्षम उमेदवार आहेत.त्यांचे साठी प्रखरतेने मागणी केली जाईल. यापूर्वी राज्यात समाजाचे 20 चे वर आमदार निवडून यायचे. परंतु काही विविध पक्षातील प्रस्तापित लोकांनी नेहमीच समाजाला डावलून अन्याय केलेला आहे.यापुढे समाज असा अन्याय सहन करणार नाही. याची सर्व पक्षांनी नोंद घेऊन आमचा सन्मान करावा.
आज पावेतो महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने अनेक वेळा, अनेक मागण्या राज्य शासनाकडे सादर केलेल्या आहेत परंतु तेली समाजाच्या एकाही मागणीबाबत राज्य शासन गंभीर नाही. राज्यात एक कोटीच्या वर असलेल्या या समाजाला उपेक्षिताप्रमाणे वागणूक मिळत आहे याची फक्त खंतच नव्हे तर समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
विदर्भात मोठ्या प्रमाणावर समाज आहे. आमचा समाज कष्टाळू, मेहनती व इमानदार आहे. राजकारणात प्रतिनिधित्व मिळावे व त्याचबरोबर समाजाचे आराद्य दैवत संत श्रीसंताजी जगनाडे महाराज यांच्या नांवे तेली समाजाचा आर्थिक विकास व्हावा म्हणून तेलीघाणा प्रतिष्ठान/महामंडळ मिळावे, तेली समाजाला वसतीगृहासाठी नवीमुंबईमधे भूखंड मिळावा याकरिता वारंवार मागणी करून सुद्धा तेली समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याने जर येत्या विधानसभेत व होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तेली समाजाला १०% आरक्षण न मिळाल्यास तेली समाज याबाबत टोकाची भूमिका घेईल याची प्रत्येक प्रस्थापित पक्षाने दखल घ्यावी..! या प्रसंगी पत्रकार परिषद सुधा घेण्यात आली.
पत्रकार परिषदेला राज्य अध्यक्ष श्री रामदासजी तडस, माजी खासदार, कोषाध्यक्ष श्री गजानन शेलार, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, राज्य उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, चरण वाघमारे, सहसचिव/विदर्भ प्रभारी श्री बळवंत मोरघडे, सहसचिव श्री सुनील चौधरी, नागपूर विभाग अध्यक्ष श्री जगदीश वैद्य, महिला अध्यक्ष ,सौ. नयना झाडे, युवा अध्यक्ष श्री प्रवीण बावनकुळे, ना. ग्रां. अध्यक्ष श्री पुष्कर डांगरे शहर अध्यक्ष श्री किशोर भिवगडे, अध्यक्ष सौ मंगला मस्के, ज्येष्ठ उपाध्यक्ष श्री रमेश उमाटे, निखिल भुते आदी प्रामुख्याने हजर होते.