* पाच एकल विद्यालये घेणार दत्तक
* एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप
नागपूर समाचार : नक्षलवादाने पोखरलेल्या असुरक्षित, अभाव असलेल्या आदिवासी क्षेत्रात राहून कार्य करणा-या एकलव्य एकल विद्यालयाचे शिक्षक हे केवळ बालक निर्माणाचेच नाही तर कुटुंब, समाज आणि राष्ट्र निर्माणाचे कार्य करीत आहेत, असे गौरवोद्गार गुजरातचे राज्यपाल महामहिल आचार्य देवव्रत यांनी काढले. त्यांनी दरवर्षी आपण पाच एकल विद्यालयांचा खर्च उचलणार असल्याची घोषणाही केली.
कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था, विदर्भ याअंतर्गत येणार्या एकलव्य एकल विद्यालयाचा चार दिवसीय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप रविवारी रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री, तसेच संस्थेचे प्रेरणास्रोत, मार्गदर्शक नितीन गडकरी होते तर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, अंजनगाव सुर्जी श्री देवनाथ पिठाचे पिठाधिश्वर श्रद्धेय जितेंद्रनाथ महाराज, दिल्लीच्या एफआयसीसीआयच्या चेअरपर्सन डॉ. पायल कनोडिया, प्रसिद्ध उद्योगपती सत्यनारायणजी नुवाल, कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे अध्यक्ष अरुण लखानी, सचिव राजीव हडप, अतुल मोहरीर, डॉ. उपेंद्र कोठेकर, सुधीर दिवे, अॅड. वसंत चुटे, डॉ. मुरलीधर चांदेकर, धनंजय बापट यांची विशेष उपस्थिती होती. लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या संकेतस्थळाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पूर्व व पश्चिम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या शिक्षक व पर्यवेक्षकांचा यांचा सत्कार करण्यात आला.
कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता त्याग, तपस्या आणि मेहनतीने मानव निर्माण करणा-या शिक्षक व पर्यवेक्षकांनी कधीच निराश होऊ नये, न्यूनगंड बाळगू नये, असे सांगताना आचार्य देवव्रत यांनी, अभावाच्या परिस्थितीच जगात मोठे परिवर्तन झाल्याचे इतिहास सांगत असल्याचे उद्गार काढले.
जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, वनवासी, आदिवासी क्षेत्रात काम करणारे शिक्षक-पर्यवेक्षक एकल विद्यालयाच्या माध्यमातून देशभक्त निर्माण करीत आहेत. ते भारताच्या सामर्थ्याशाली संस्कृती, परंपरा, जीवनशैलीचे रक्षण करीत असून ते भारतमातेच्या अखंडतेचे प्रतिक आहेत. मानकर ट्रस्ट अशा ऋषितुल्य भारतमातेच्या सुपूत्राच्या निर्माणाचे कार्य करीत आहे.
एकल विद्यालयांचे कार्य करणा-या डॉ. पायल कनोडिया म्हणाल्या, ‘जेथे गाव तेथे शाळा’ या उक्तीनुसार एकल काम करीत असून आदिवासी क्षेत्रातील त्यांचे काम मोठे आहे. शिक्षक व पयर्वेक्षकांनी या समाजात संस्कार देण्याचे, प्रशिक्षणाद्वारे त्यांची गुणवत्ता वाढवण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी उजळलेल्या या ज्ञानाचा दीपामुळेच आदिवासी समाज प्रगतीच्या पथावर चालत राहील व देशाला विश्वगुरू पदापर्यंत पेाहोचवेल.
प्रास्ताविक अरुण लखानी यांनी केले. सूत्रसंचालन विरेंद्र अंजनकर यांनी केले. लक्ष्मणराव मानकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला तसेच, एकल विद्यालयांच्या कार्याचा आढावा घेतला.
गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी युवक युवतींनी आदिवासी नृत्य सादर केले. स्व. अरविंद शहापूरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आभार प्रदर्शन रुपेश ढेपे यांनी केले.
शिक्षक-पर्यवेक्षकांमुळे ट्रस्टच्या कार्याला यश – नितीन गडकरी
पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणेतून मानकर ट्रस्टने आदिवासी, वनवासी जमातीचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास करण्याचा ध्यास घेतला. हे काम करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला परंतु समाजाच्या सहयोगामुळे तसेच शिक्षक आणि पर्यवेक्षकांच्या मेहनतीमुळेच 26 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या ट्रस्टच्या कार्याला यश प्राप्त झाले आहे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.