सौर ऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण
नागपूर समाचार : दिव्यांगांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. ट्रायसिकल वितरित करताना दिव्यांगांना त्यांचा अधिकार प्रदान करण्याचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) येथे केले.
ना. गडकरी यांच्या हस्ते नागपूर शहरातील ३० अस्थिव्यंग दिव्यांगांना सौर ऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार मोहन मते, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, माजी नगरसेवक मुन्ना महाजन, विशाखापट्टणम येथील एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा, समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तिकरण केंद्राचे (सीआरसी) संचालक प्रफुल्ल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापूर्वी ४६ दिव्यांगांना ही ट्रायसिकल देण्यात आली आहे. एकूण ७६ दिव्यांग लाभार्थी ठरले आहेत. ना. गडकरी म्हणाले, ‘अनेक दिव्यांगांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. रोजगाराचा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. ट्रायसिकल दिल्यामुळे त्यांना छोटा-मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविणे शक्य होणार आहे.’ ना. गडकरी यांच्या पुढाकारातून आतापर्यंत ४० हजारांहून अधिक दिव्यांगांना साहित्य वितरित करण्यात आले आहे. जवळपास ८०० दिव्यांगांना कृत्रिम पाय दिले आहेत. त्यातील अनेक दिव्यांग आज बुलेट चालवू शकतात, याचा ना. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. लवकरच १ हजार दिव्यांगांना ई-रिक्शासाठी मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती ना. गडकरी यांनी दिली.
४० किलोमीटरचा मायलेज
सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या वाहनाचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत आहे. याशिवाय ४० किलोमीटरचा कमाल मायलेज देण्याची क्षमता यामध्ये आहे. अतिशय मजबूत रचना आणि संक्षिप्त स्वरुपातील मोटराईज्ड ट्रायसिकलमध्ये इलेक्ट्रिक ब्रेक कंट्रोल सिस्टीमदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वाहनाचे इलेक्ट्रिक चार्जिंगदेखील शक्य आहे. त्यादृष्टीने एक पॉवर केबल त्यासोबत दिलेला आहे. समायोजित (अॅडजस्टेबल) होऊ शकणारे हँडल आणि बॅटरी पातळी निर्देशक ही ट्रायसिकलची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.