नागपूर समाचार : नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.२६) सकाळी संत्रा मार्केट परिसराची पाहणी केली. या परिसरात रात्रीच्या वेळी देखील स्वच्छता करण्याबाबत त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला निर्देश दिले.
मनपा आयुक्तांनी कचरा ट्रान्सफर स्टेशनवर सुद्धा स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी घनकचरा व्यस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, गांधीबाग महाल झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड उपस्थित होते.
आयुक्तांनी बाजारपेठेत पसरलेल्या घाणीबाबत नाराजी व्यक्त केली आणि नियमित स्वच्छतेवर भर देण्याचे आदेश दिले. बाजारपेठेतील कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये घेऊन जाण्याकरिता कचरा संकलीत करून ट्रान्सफर स्टेशनवर आणला जातो. या ट्रान्सफर स्टेशनचे देखील आयुक्तांनी निरीक्षण केले. ट्रान्सफर स्टेशनवर मोठ्या प्रमाणात कचरा विखुरलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी बाजारपेठेत रात्रकालीन स्वच्छता करण्याचे निर्देशही संबंधितांना दिले. त्यांनी बाजारपेठेत नियुक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची माहिती प्राप्त करून घेतली. यावेळी गांधीबाग झोनचे स्वच्छता अधिकारी सुरेश खरे उपस्थित होते.