- Breaking News, उत्सव, धार्मिक 

नागपूर समाचार : इस्कॉन नागपूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी थाटामाटात साजरी

लोकनाथ स्वामी महाराज यांची विशेष उपस्थिती

नागपूर समाचार : इस्कॉन नागपूर तर्फे श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या उत्सवाची सुरुवात सकाळी साडेचार वाजता गेट क्रमांक २ एम्प्रेस मॉलच्या पाठीमागे असलेल्‍या श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरात मंगल आरतीने झाली. त्यानंतर तुलसी आरती, गुरुपूजा आणि श्री श्री राधा-गोपीनाथांची दिव्य शृंगार आरती झाली. सकाळपासूनच मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांची वर्दळ होती. काही वेळा तर अर्ध्या किलोमीटरहून अधिक लांबीची रांग बघायला मिळाली. भाविकांची गर्दी पाहून रात्री दोन वाजेपर्यंत मंदिराचे दरवाजे सुरू ठेवण्‍यात आले होते. भाविकांना झालेल्‍या त्रासाबद्दल मंदिर प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

त्याच दिवशी रेशीमबाग मैदानावरही सकाळी १० ते रात्री १० या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवंतांच्‍या अभिषेकाने झाली, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांमध्ये निलांजन सुंदर, कृष्ण मुरारी, गोविंद बोलो हरी गोपाल या भक्तिगीतांचा समावेश होता. यासोबत इस्कॉन प्रल्हाद स्कूल आणि इस्कॉन गर्ल्स फोरमच्या मुलांनी सादर केलेल्या नाटकांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये ‘गोपी का विरह प्रेम’, ‘कृष्णा द सेव्हिअर’, ‘हॉट सॉस’ हे नाट्य सादरीकरण विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले.

या दिवसाचे मुख्य आकर्षणांपैकी एक होता “मंत्रा रॉक” हा अद्वितीय, अध्यात्मिक संगीत आणि भक्ती यांचा संगम असलेला कार्यक्रम. या कार्यक्रमात संगीत आणि कीर्तनाचा संगीतमय संगम बघायला मिळाला. त्यामुळे उपस्थित जनसमुदाय भावूक झाला.

या शुभप्रसंगी, श्रील प्रभुपादांचे प्रिय शिष्य आणि आंतरराष्ट्रीय पदयात्रा मंत्री त्रिदंडी संन्यासी, परमपूज्य श्रील लोकनाथ स्वामी महाराज यांचे सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी विशेष आगमन झाले.

रेशीमबागच्या कार्यक्रमात भाविकांच्या सोयीसाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. अभिषेक करण्यासाठी चार केंद्रे तयार करण्यात आली. येथेही सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांचा ओघ कायम होता. तीन मोठे घुमट बांधण्यात आले होते पण गर्दी होऊ नये, भक्तांचा ओघ कायम राहावा म्हणून खुर्च्यांची संख्या कमी ठेवण्यात आली होती. मंदिर आणि रेशीमबाग या दोन्ही ठिकाणी लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

या प्रसंगी प्रमुखपणे उपस्थित होते कॉन्फिडेंस पेट्रोलचे नितीन खरा, बैद्यनाथचे सुरेश शर्मा, रामसंसचे रामस्वरूप सारडा आणी राजेश सारडा, सूर्यम्बा इंडस्ट्रीजचे क्ही.के. अग्रवाल,, अहिरकर ग्रुप आणि सावजी मसालाचे अनिल अहिरकर, रेवती कॉर्पोरेशनचे दीपक निलावार, सिम्प्लेक्स केमोपॅक प्रा.लि.चे दामोदर सारडा, आर्यन हॉस्पिटलचे निखिल कुसुमकर, डिफ्यूजन इंजिनीअरिंग लिमिटेडचे नीलू प्रशांत गर्ग, सतीश गोयल, धरमपाल अग्रवाल, राजकुमार गुप्ता आदी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा भव्य सोहळा इस्कॉन नागपूरचे अध्यक्ष सच्चिदानंद प्रभू आणि उपाध्यक्ष व्रजेंद्रतनय प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भक्त आणि समर्पित सदस्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे संपन्न झाला.

डॉ. श्यामसुंदर शर्मा प्रवक्ता, इस्कॉन, नागपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *