विदर्भ-महाराष्ट्रातील संधी शोधण्यासाठी ‘एआयडी’ द्वारे आयोजन
नागपूर समाचार : नागपुरातील असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) तर्फे आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करताना, श्री गिरीश महाजन, माननीय पर्यटन मंत्री, महाराष्ट्र सरकार यांनी दरम्यान दिलेले वचन पाळले असून 18 जुलै 2024 रोजी पर्यटन धोरण 2024 ची घोषणा करण्यात आली आहे. माननीय केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात विदर्भावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने जानेवारी 2024 मध्ये ॲडव्हांटेज विदर्भचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नवीन पर्यटन धोरण जाहीर करण्यावर भर देण्यात आला होता.
नवीन पर्यटन धोरणाच्या फायद्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि विदर्भातील पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील संधी जाणून घेण्यासाठी एआयडीच्यावतीने ‘पर्यटन धोरण 2024 : ॲडव्हान्टेज विदर्भ कॉन्क्लेव्ह’ चे शनिवार, 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. ग्रँड एअरपोर्ट बँक्वेट, दक्षिण मेट्रो स्टेशन, वर्धा रोड, नागपूर येथे होणा-या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी, माननीय पर्यटन मंत्री, श्री गिरीश महाजन आणि डॉ. बी.एन. पाटील, आयएएस, माननीय संचालक, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन उपस्थित राहणार आहेत.
पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूकीला मिळणार चालना
पर्यटन धोरण 2024 हे सर्वसमावेशक असून त्यात हॉटेल्स, मोटेल, युवा वसतिगृहे, रिसॉर्ट्स, सर्व्हिस अपार्टमेंट्स, ॲग्रो-इको टुरिझम युनिट्स, होमस्टे, बेड आणि ब्रेकफास्ट आस्थापना, सुट्टीसाठी भाड्याने घरे, तंबूत राहण्याची व्यवस्था, ट्री हाऊसेस, क्रूझ बोट्स, हाउसबोट्स, रेस्टॉरंट्स, कन्व्हेन्शन सेंटर्स, वेलनेस सेंटर्स, हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, ॲम्युझमेंट पार्क्स, ॲडव्हेंचर टुरिझम युनिट्स, गोल्फ कोर्स, हेली टुरिझम प्रोजेक्ट्स यांसारख्या विविध घटकांचा समावेश आहे.
हॉटेल्स, मोटेल आणि रिसॉर्ट्स सारख्या पात्र पर्यटन घटकांना प्रकल्प खर्चावर 20% रोख सबसिडी देणारे हे धोरण महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रातील गुंतवणुकीला लक्षणीय चालना देणारे ठरेल, अशी अपेक्षा आहे. अतिरिक्त वित्तीय फायद्यांमध्ये भरलेल्या निव्वळ एसजीएसटीचा 100% परतावा, रु. 50 लाख पर्यंतच्या मुदत कर्जावरील व्याज सवलत वीज शुल्क सूट, वीज दर परतावा आणि शाश्वत उपक्रमांसाठी प्रोत्साहन यांचा समावेश आहे.
राज्यात लक्षणीय गुंतवणूक आकर्षित करताना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेले हे धोरण गेम चेंजर ठरणार असून, भारतातील इतर राज्यांसाठी ते मॉडेल बनण्याची शक्यता आहे, असे एआयडीचे उपाध्यक्ष व प्रकल्प समन्वयक गिरधारी मंत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
एआयडीचे अध्यक्ष विलास काळे म्हणाले की, ही कॉन्क्लेव्ह हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट आणि गुंतवणूक क्षेत्रातील भागधारकांना नवीन धोरणाविषयी विस्तृत माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या प्रकल्पांसाठी संभाव्य लाभांमध्ये वृद्धी करण्याची अनमोल संधी उपलब्ध करून देणार आहे. विद्यमान प्रकल्प देखील विशिष्ट निकषांची पूर्तता केल्यास या लाभांसाठी पात्र ठरू शकतात, असेही ते म्हणाले.
विविध संघटनांचा सहभाग
या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकार आणि पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र सरकार यांचे समर्थन प्राप्त असून भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) हे बँकिंग पार्टनर आहेत. नागपूर रेसिडेंशियल हॉटेल्स असोसिएशन (NRHA), स्मार्ट वेल्फेअर फाऊंडेशन, नागपूर टूर ऑर्गनायझर्स असोसिएशन, असोसिएशन ऑफ डोमेस्टिक टूर ऑपरेटर्स ऑफ इंडिया (ADTOI), ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया (TAAI) आणि विदर्भ टुरिझम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एआयडीचे पदाधिकारी श्री प्रणव शर्मा, उपाध्यक्ष, प्रा.राजेश बागडी, कोषाध्यक्ष प्रा.राजेश बागडी आणि सदस्य श्री निखिल गडकरी, डॉ. महेंद्र क्षीरसागर, श्री प्रशांत उगेमुगे, श्री राजेश रोकडे, श्री प्रदीप माहेश्वरी आणि श्री रवींद्र बोरटकर, तेजिंदर सिंग रेणू, अध्यक्ष, NRHA आणि पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्र, AID चे संयोजक; पंकज महाजन, अध्यक्ष, स्मार्ट वेल्फेअर; संजय देशपांडे, अध्यक्ष, टूर ऑर्गनायझर्स असोसिएशन; धर्मेंद्र सिंग, चॅप्टर हेड, एडीटीओआय, महाराष्ट्र; राजेश अग्रवाल, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, नागपूर (TAAI); किशोर हांडा, अध्यक्ष, विदर्भ टुरिझम असोसिएशन परिश्रम घेत आहेत.
प्रतिनिधी नोंदणीसाठी विजय फडणवीस (9326546448), निवेदिता अटाळकर (8956366441) आणि प्रायोजकत्वासाठी पंकज भोकरे (9998559288) यांच्याशी संपर्क साधावा.
पत्रकार परिषदेत व्यासपीठावर एआयडीचे अध्यक्ष श्री आशिष काळे, उपाध्यक्ष श्री गिरधारी मंत्री, आणि सचिव डॉ. विजय शर्मा, तेजिंदरसिंग रेणू, पंकज महाजन, प्रणव शर्मा, प्रा.राजेश बागडी, राजेश रोकडे, प्रशांत सवाई, अमोल खंते उपस्थित होते.