*काँग्रेसचे उद्या संविधान चौकात बदलापूरच्या घटनेविरोधात धरणे आंदोलन
*पराते यांना सर्व बैठकांपासून दूर ठेवण्यात आले:पत्रकार परिषदेची माहिती देणे ही टाळले
*अन्याय नाही सहन करणार:पराते यांचा इशारा
नागपूर समाचार : संविधान चौकात उद्या सकाळी ११ वा.राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार बदलापूरच्या दूर्देवी घटनेच्या निषेधार्थ महिला काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनासाठी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी मागील चार दिवसांपासून नागपूरात तळ ठाेकला आहे.आंदोलनाला घेऊन अनेक बैठका पार पडल्या मात्र,काँग्रेसच्या नागपूर शहर अध्यक्ष ॲड.नंदा पराते यांना सर्व बैठकांपासून दूर ठेवण्यात आले,इतकंच नव्हे तर आंदोलनाची माहिती देण्यासाठी सव्वालाखे यांनी मुंबईच्या इतर पदाधिका-यांसोबत आज पत्रकार परिषद घेतली,त्याची देखील माहिती नंदा पराते यांच्याकडून लपविण्यात आल्याने, पराते यांनी प्रेस क्लब येथे पोहोचून त्यांच्यापेक्षा वरिष्ठ पदावरील प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांना चक्क आपला वैदर्भिय बाणा दाखवित जाब विचारला.
या घटनेमुळे सव्वालाखे या अंचभित झाल्या.पत्रकार परिषदे दरम्यान सव्वालाखे यांच्या सोबत काँग्रेसच्या आजी-माजी शहराध्यक्ष का नाहीत?असा प्रश्न केला असता.नॅश नुसरत अली माजी शहराध्यक्ष उद्याच्या आंदोलनाच्या तयारीत व्यस्त असल्याचे उत्तर त्यांनी दिले तसेच विद्यमान शहराध्यक्ष ॲड.नंदा पराते यांना देखील इतर काम आल्याने येऊ शकल्या नाहीत,असे उत्तर सव्वालाखे यांनी दिले होते.पत्रकारांच्या या प्रश्नामुळे मंचावर बसलेल्या महिला पदाधिका-यांनाही आश्चर्य वाटले व त्या पैकी एकीने पराते यांना,कुठे आहेस?म्हणून विचारणा केली.त्यावेळी पराते या रवि भवनात सव्वालाखे यांच्याकडून पत्रकार परिषदेसाठी निरोप येण्याची दीड तासांपासून वाट बघत होत्या.प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद ओटापली सुद्धा,हे कळताच त्या रविभवनातून तडक प्रेस क्लब येथे आल्या. प्रेस क्लबच्या परिसरात उभ्या असणा-या सव्वालाखे तसेच इतर पदाधिका-यांना संतापाने जाब विचारला.या वेळी त्यांना फक्त रडू कोसळणे शिल्लक होते!
गेल्या दीड तासांपासून चार वेळा फोन लाऊन ,पत्रकार परिषदेसाठी विचारणा करीत होते,केव्हा आहे,कुठे होणार आहे पत्रकार परिषद अशी विचारणा करीत होते मात्र,कोणीही मला सांगितले नाही व मला सोबत न घेताच पत्रकार परिषद घेण्यात आली,असा त्रागा त्यांनी पत्रकारांकडे व्यक्त केला.सातत्याने ’आम्हाला माहिती नाही’असे उत्तर मला देण्यात आले.गेल्या चार दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वीय सचिव उज्वला साळवे तसेच नीता त्रिवेदी मला मुंबईहून आलेल्या महिला पदाधिका-यांची आमदार निवासातील निवासाची व्यवस्था,अगदी त्यांच्या पलंगावरील चादर चांगली असावी अश्या सूचना देईपर्यंत मी पक्षासाठी सगळं केलं,पोलिस ठाण्यात आंदोलनासाठी अर्ज देणे,परवानगी घेणे यासाठी त्यांनी मला दहा फोन केले मात्र,पत्रकार परिषदेसाठी मी केलेल्या कॉलला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीत,जे न्याय नव्हते,असे पराते म्हणाल्या.
मी आंदोलनातून आलेली लढवय्या महिला असून, एका अधिका-याची पत्नी आहे.मी काँग्रेस पक्षात कोणाचे पाय धरुन आले नाही.माझी काँग्रेसच्या विचारधारेवर अतुट निष्ठा आहे.माझी प्रामाणिकता बघूनच मुकुल वासनिक यांनी मला पक्षात आणले.त्यांना मी माझा राजकीय गुरु मानते,असे नंदा सांगतात.
पराते यांना सोबत न घेता सव्वालाखे यांनी पत्रकार परिषद का घेतली?त्या व्यस्त असल्याचे खोटे का सांगितले?असा प्रश्न सव्वालाखे यांना विचारला असता,हा मिसकम्यूनिकेशनचा भाग आहे, आमचे तीन व्हॉट्स ॲप ग्रूप्स आहेत,त्यात पत्रकार परिषदेविषयीची माहिती कदाचित पराते यांच्या वाचण्यात आली नसावी,असा बचावात्मक पवित्रा सव्वालाखे यांनी घेतला.यावर मिसकम्यूनिकेशन कोणासोबत होतं?असा सवाल पराते यांनी केला.काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष नागपूरात येतात व त्या शहराच्या अध्यक्षांनाच सोबत घेत नाहीत,बैठकींपासून दूर ठेवतात,तिला अंधारात ठेऊन पत्रकार परिषद घेऊन मोकळी होतात,असं कधी घडतं का?असा खडा सवाल पराते करतात.
याच प्रदेशाध्यक्षांनी आमदार रवि राणा यांच्या एका वादग्रस्त विधानाच्या विरोधात नागपूरात आंदोलन घेण्याची सूचना मला सकाळी ११ वा.दिली व दूपारी ३ वा.आंदोलन घेण्यास सांगितले.अवघ्या तीन तासात महिलांना जमा करुन व्हेरायटी चौकातील गांधीजींच्या पुतळ्या समोर आ.रवि राणांच्या विरोधात यशस्वी आंदोलन केले असल्याचे नंदा सांगतात.
प्रदेशाध्यक्ष सव्वालाखे यांनी पराते यांना मीच शहराध्यक्ष केले आहे,त्या आमच्याच पदाधिकारी आहेत,त्यांचा काही गैरसमज झाला असल्याची मखलाशी पत्रकारांकडे केली ,या विषयी विचारले असता,प्रदेशाध्यक्ष सव्वालाखे यांच्याकडून मान,सन्मान मिळाला नसल्याची खंत पराते व्यक्त करतात.त्यांच्यासाठी आंदोलनाच्या चार दिवस आधीच्या बैठका जरी महत्वपूर्ण असल्या तरी मी गेल्या तीन महिन्यांपासून शहराध्यक्ष म्हणून पक्षासाठी जीवाचं रान करते,असे त्या सांगतात.मला शहराध्यक्ष कोणी बनवलं याची माहिती नाही मात्र,काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्याकडून योग्य सन्मान मिळतो,मंचावर बरोबरीचे स्थान ते देतात,येथे तर सव्वालाखे माझ्यासोबत बोलत ही नाहीत,त्यांच्या स्वीय सहायक दोन्ही महिलांच मला ऑर्डर देतात,असे पराते यांनी सांगितले.
उद्याच्या आंदोलनात माझ्या नेतृत्वात मध्य नागपूरातील मुस्लिम बांधव हे टेकडी गणपतीपासून संविधान चौकापर्यंत रॅली काढणार आहेत.मोठ्या संख्येने महिलांची पदयात्रा मी उद्या काढत आहे.मी पक्षासाठी किती ही मोठं योगदान देऊ शकते,फक्त मी अन्याय सहन करु शकत नाही,उद्याच्या आंदोलनाचं नावच ‘नारी न्याय आंदोलन ’आहे,अश्यावेळी पक्षांतर्गतच एखाद्या समर्पित कार्यकर्तीवर अन्याय होत असेल तर,गप्प बसू शकत नाही,असे पराते स्पष्ट करतात.
पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेते,नोकरशाही ,कलावंत तसेच पदाधिका-यांमध्ये वैदिर्भियांना मागास समजण्याची मानसिकत खोलवर रुजली आहे,सव्वालाखे यांनी देखील याच मानसिकतेतून वैदर्भिय शहराध्यक्षासोबत खेळी केली,असं तुम्हाला वाटतं का?असा प्रश्न केला असता,विदर्भाला प्रत्येक बाबतीत मागास कोणी ठेवले?असा उलट प्रश्न पराते करतात.
आजच्या तुमच्या या रौद्र रुपानंतर शहराध्यक्षाचे पद राहणार की जाणार?असे विचारले असता,या विषयी काहीही सांगू शकत नाही,माझा पक्ष यावर निर्णय घेईल,असे पराते सांगतात.
तळटीप :- ही पक्षांतर्गत बाब होती त्यामुळे ती पक्षाच्या व्यासपीठावरच सोडवली जाऊ शकली असती. मात्र,असे घडले नाही.भावनेच्या भरात नंदा पराते यांनी रवि भवनातून प्रेस क्लब येथे धाव घेतली.पुढे जे घडले,त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे तक्रार होणार हे निश्चित. कारवाई होऊन कदाचित ॲड.नंदा पराते यांच्यावर कारवाई देखील होईल,केवळ शहराध्यक्षाचे पदच जाणार नाही तर कदाचित सदस्यत्वातून देखील बेदखल केले जाईल मात्र,महाराष्ट्र प्रदेश जिल्हाध्यक्ष नागपूरात येऊनसुद्धा आपल्याच पक्षाच्या शहराध्यक्षांना टाळत असतील,नंदा पराते सांगतात त्याप्रमाणे अन्यायपूर्ण अशी वागणूक देत असतील तर २०१४ नंतर ही या पक्षाला गटा-तटाच्या राजकारणाच्या शापापासून मुक्त व्हायचे नाही,असाच त्याचा अर्थ ध्वनित होतो.