नागपूर समाचार : शहरात सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी असे निदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
“श्री” गणरायाचे येत्या ७ सप्टेंबर रोजी आगमन होत आहे. यंदाचा गणेशोत्सव संपूर्णतः पर्यावरणपूरक साजरा करण्यात यावा या अनुषंगाने मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवार (ता:२८) अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या आयुक्त सभा कक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त प्रकाश वराडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, सहायक आयुक्त सर्वश्री. नरेंद्र बावनकर, हरीश राऊत, अशोक घारोटे, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्यासह झोनचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गणेशोत्सवासाठी झोन स्तरावर करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनेंचा आढावा घेतला. बैठकीत मार्गदर्शनकरीत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच गणेशोत्सव मंडळांसाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परवानगी आणि एक खिडकी परवानगी केंद्रासंदर्भात पोलीस विभागाशी समन्वयसाधून कार्य करावे, झोन निहाय मदत कक्षाची स्थापना करावी, केंद्रांत लागणाऱ्या आवश्यक मनुष्यबळाची सोय करावी, मनपाद्वारे गणेश विसर्जनासाठी लावण्यात येणाऱ्या कृत्रिम टँकची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय यावर भर द्यावा, विसर्जनासाठीच्या मार्गावर आणि विसर्जनस्थळी नियमित स्वच्छतेची व्यवस्था ठेवावी, मोठ्या विसर्जन स्थळाजवळ मोबाईल टोयलेटची व्यवस्था करावी, झोन निहाय गणेश मूर्ती स्वीकार केंद्रांची स्थापना करावी, पारंपारिक मूर्तीकारांना मूर्ती विक्रीसाठी लागणाऱ्या जागेची व्यवस्था करावी, आदी निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.