नागपूर समाचार : रस्ते बांधकाम व विकासाच्या कामांच्या संदर्भात नागपूर शहरातील विकास यंत्रणांचा आपसात समन्वय दिसत नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी तात्काळ पावले न उचलल्यास संबंधित यंत्रणांमधील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अलिकडेच ना. गडकरी यांनी नागपूर महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या कामांसंदर्भात जनसंपर्क कार्यक्रमांचे आयोजन केले. तेथे नागरिकांनी या दोन्ही यंत्रणांबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि मा. मंत्री महोदयांना आपल्या अडचणींची, त्रासाची निवेदनेही दिली. याशिवाय, अनेक लोकप्रतिनिधींनी विकास कामांतील समन्वयाचा अभाव आणि त्याच्या परिणामी नागरिकांना होत असलेला त्रास ना. गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिला.
या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या एका वक्तव्यात गडकरी यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा, दिवाळी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन यासारखे प्रसंग तोंडावर आलेले असताना नागपूर शहरातील विकास यंत्रणांमध्ये आपसात समन्वय दिसत नाही. रस्त्यांच्या कामांच्या संदर्भात तर हे प्रकर्षाने दिसत आहे. ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. त्यामुळे रोगराई वाढत चालली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर महापालिका, नासुप्र, मेट्रो रेल्वे, विद्युत विभाग, टेलिफोन विभाग यांच्यात कोणताही समन्वय नाही. कुणीही येतो आणि तयार झालेला रस्ता खोदतो. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. प्रदूषण वाढते. नागरिकांना त्रास होतो. अपघात होतात. सर्व संबंधित यंत्रणा आणि विभागांनी आपसात समन्वय साधून विकास कामे केल्यास असे प्रश्न उपस्थित होणार नाहीत. त्यामुळे आता या यंत्रणा आणि संस्थांच्या प्रमुखांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि नागरिकांचा त्रास संपवावा किंवा कारवाईस सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे.
नागपुरातील विकास कामे जोरात सुरू आहेत. पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. विकासकामे होत आहेत, याचे समाधान आहे. पण, विकासाचा त्रास नागरिकांना होत असेल तर त्याबद्दल संबंधित यंत्रणांनी जागरूक असले पाहिजे. रस्त्यांच्या बांधकामात लेव्हल तपासून पुढे जाणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था राखणे, वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेणे हे सारे होत नसल्यामुळे या विकास कामांबद्दल आस्था वाटण्याऐवजी नागरिक नाराजी व्यक्त करीत असल्याकडे मा. ना. गडकरी यांनी लक्ष वेधले आहे.
शहरातील ज्या भागांत रस्त्यावर मेट्रो स्टेशन तयार झालेले आहेत, त्या स्टेशनच्या समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. मेट्रो प्रवाशांना त्यामुळे त्रास होत आहे. सणासुदीच्या दिवसात रस्ते व बाजारपेठांमध्ये गर्दी वाढते. त्याचा विचार करता सर्व विभागांनी आपापल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कामांचा आढावा घ्यावा आणि आपसातील समन्वयानेच कामे पुढे जातील, याची काळजी घ्यावी, असे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत. असे झाले नाही, तर जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.